अहिल्यानगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगर शहरात शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय मुलीला नोकरी देण्याच्या निमित्ताने बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा जिल्हाध्यक्षाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय ?
अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर एका २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अभिषेक कळमकर यांनी तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अहिल्यानगर शहरात तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अभिषेक कळमकर वेळोवेळी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून तरुणीला कपडे काढण्यास भाग पाडत होते आणि तिला तासनतास त्रास देत होते. या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर संबंधित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. अत्याचार करताना आरोपीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोपही तरुणीने केला आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित तरुणीने या संदर्भातील काही व्हिडिओ स्वरूपातील पुरावे पोलिसांकडे सादर केल्याची माहिती मिळत आहे. या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.







