इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या राजघराण्यापेक्षा कायदा मोठा ठरला आहे. ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांचे छोटे भाऊ, पूर्व प्रिंस अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एपस्टीन फाइल्समध्ये त्यांचे नाव आल्यानंतरच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एप्सटिन फाईलमधली त्यांचा उल्लेख ही केवळ अफवा नसून त्यात तथ्य असल्याचे आता बोलले जात आहे.
गेल्या वर्षी, आठवडाभर चाललेल्या चौकशीनंतर, अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांची प्रिन्स चार्ल्स ही पदवी काढून घेण्यात आली. शिवाय, त्यांना रॉयल लॉज हवेली सोडण्यास भाग पाडण्यात आले. बकिंगहॅम पॅलेसने चौकशी दरम्यान एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये असे म्हटले होते की, राजाचा भाऊ आता फक्त अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर म्हणून ओळखला जाईल.
पोलिसांनी अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना त्यांच्या ६६ व्या वाढदिवशीच अटक केली. आज सकाळी ८ वाजता त्यांना अटक करण्यात आली. त्यांना अटक करण्यासाठी वाहनांच्या ताफ्यासह पोलिस त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना सोबत घेऊन गेले.
काय म्हणाले ब्रिटन पोलीस ?
थेम्स व्हॅली पोलिसांनी सांगितले की, १९ फेब्रुवारी २०२६च्या चौकशीदरम्यान नॉरफोक येथील सुमारे ६६ वर्षांच्या एका व्यक्तीला सार्वजनिक पदाचा गैरवापर (misconduct in public office) केल्याच्या संशयावर अटक करण्यात आली आहे. बर्कशायर आणि नॉरफोकमधील काही ठिकाणी तपासणीही सुरू आहे. सध्या या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
एपस्टीनशी असलेल्या संबंधांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांनी वारंवार त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत. पोलीस सध्या अँड्र्यूंवरील आरोपांची चौकशी करत आहेत. माउंटबॅटन-विंडसर यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांचा भाऊ राजा यांच्याशी चर्चा केल्यानंतर ड्यूक ऑफ यॉर्कची पदवी आणि सन्मान सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या राजघराण्यातील काही पदव्या काढून घेण्यात आल्या आणि त्यांना राजघराणे सोडण्यास सांगण्यात आले. शिवाय, माउंटबॅटन-विंडसर यांच्या लष्करी पदव्या देखील मागे घेण्यात आल्या आहेत.
लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर त्यांच्याकडून आधीच सर्व लष्करी पदव्या आणि राजघराण्यातील मानमरातब काढून घेण्यात आले होते. मात्र, आता त्यांना थेट अटक झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानंतर राजघराण्यासमोर आलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट मानले जात आहे. या अटकेमुळे केवळ ब्रिटनमध्येच नाही, तर संपूर्ण जगात ब्रिटिश राजघराण्याच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 'पब्लिक ऑफिसचा गैरवापर' केल्याचा ठपका ठेवत लंडन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.







