मुंबई : मराठीचा मुद्दा उपस्थित करून प्रियांका चतुर्वेदी यांचा राज्यसभा निवडणुकीत पत्ता कट करण्याची संजय राऊत यांची चाल आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. राज्यसभेचे गणित मांडताना उबाठाला वजा करून शरद पवारांचा मार्ग सुकर करण्याची धडपड संजय राऊत करीत आहेत. उबाठाच्या कोट्यात एक जागा असताना आत्ता प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर गेल्या तर टर्म संपल्यानंतर राऊतांचा पत्ता कट होणार हे माहित असल्याने राऊतांचा हा डाव असल्याचा घणाघात त्यांनी केला.
यावेळी श्री. बन म्हणाले की, रोटेशनचा मुद्दा पुढे करत यावेळी राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार असेल असे विधान आदित्य ठाकरे करत असले तरी राऊतांची तशी इच्छा अजिबात नाही. राज्यसभेच्या खासदारकी वरून आधी कधीही मराठी कार्ड न टाकणा-या राऊतांनी अचानक यावेळी मराठी कार्ड खेळले आहे. प्रियांका ह्या अमराठी असल्याने राऊतांचा हा डाव असून यावेळी राज्यसभेवर उबाठा ला संधीच मिळू नये हीच मनोमन इच्छा राऊतांची असल्याची टीका त्यांनी केली.
शिंदे- राज भेट आणि उद्धव, राऊतांचा जळफळाट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली मात्र जळफळाट झाला तो राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा असा टोमणा श्री. बन यांनी मारला. महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव यांनी राज यांचा केसाने गळा कापल्यानंतर राज यापुढे उबाठा ची साथ देतील का हा प्रश्न आपण उपस्थित केला होता याची आठवण श्री. बन यांनी करून देत येणा-या काळात नवे समीकरण समोर येईल असे म्हंटले.
मतदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत का मित्र आहेत यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे असे श्री. बन म्हणाले. श्री. शिंदे हे वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत, बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यापासून वाचवण्याचे काम करत आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताचे कार्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे खरे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणारे उद्धव ठाकरे, राऊत आहेत असा हल्लाबोल श्री. बन यांनी केला.
महाराष्ट्रातील निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर एसआयआर चे काम सुरू होत आहे, या निर्णयाचे श्री. बन यांनी स्वागत केले. बोगस बांगलादेशी घुसखोर यांची हकालपट्टी या एसआयआरच्या माध्यमातून होईल आणि मतदार यादीचे शुद्धीकरण होईल. मतदार यादी सुधारण्याचा आग्रह उच्चरवात करणा-या उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी या अभियानाचे स्वागत करायला हवे असा टोला श्री. बन यांनी लगावला. फक्त मराठी दुबार नावे उद्धव, राज यांच्या डोळ्यात खुपत होती असे म्हणत श्री. बन यांनी दोघांवर शरसंधान साधले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ड्रगमुक्त मुंबई करण्याचे भाजपा आणि महायुतीचे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास श्री. बन यांनी व्यक्त केला. यवतमाळमधील ड्रग तस्करी दुर्दैवी आहे. त्यावर गृह विभागाने योग्य कारवाई केली असल्याचे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रामध्ये दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.







