Friday, February 20, 2026

'रिपाइं'च्या मुंबईतील सर्व तालुका, वॉर्ड समित्या बरखास्त - केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा निर्णय; ५ एप्रिलपर्यंत संघटनात्मक निवडणुका घेण्याचे आदेश

'रिपाइं'च्या मुंबईतील सर्व तालुका, वॉर्ड समित्या बरखास्त - केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा निर्णय; ५ एप्रिलपर्यंत संघटनात्मक निवडणुका घेण्याचे आदेश

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपटाचा रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) मुंबईतील आपल्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील सर्व तालुका आणि वॉर्ड कमिट्या तातडीने बरखास्त करण्यात आल्या आहेत. येत्या ५ एप्रिलपर्यंत या सर्व स्तरांवर निवडणुका घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे आदेश आठवले यांनी दिले असल्याची माहिती पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी शुक्रवारी दिली.

आझाद मैदानातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कासारे बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांच्यासह मुंबई प्रदेशातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईतील पक्षसंघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि तरुण रक्ताला संधी देण्यासाठी हा व्यापक निर्णय घेण्यात आल्याचे कासारे यांनी स्पष्ट केले.

पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व वॉर्ड आणि तालुका अध्यक्षांची निवड लोकशाही मार्गाने म्हणजेच निवडणुकांद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी येत्या २५ फेब्रुवारीपासून संपूर्ण मुंबईत विशेष पक्षसदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेत नोंदणी केलेल्या क्रियाशील सदस्यांनाच वॉर्ड आणि तालुका कमिटीच्या निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. ५ एप्रिल ही या प्रक्रियेची अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा