मुंबई : राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची मोठी हवा असतानाच, आता मनोरंजनाच्या क्षेत्रात 'लाडकी विहीण योजना' नावाचे नवीन नाटक धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहे. या नाटकाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीची 'कॉमेडी क्वीन' निर्मिती सावंत प्रदीर्घ काळानंतर रंगमंचावर पुनरागमन करत आहेत. एकेकाळी ज्यांच्या नाटकांना 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड लागयचे, त्या निर्मिती सावंत पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे, 'कुमारी गंगूबाई मॅट्रिक' सारखे सुपरहिट नाटक देणारे दिग्दर्शक राजेश देशपांडे, निर्माते दिलीप जाधव आणि अभिनेत्री निर्मिती सावंत हे 'यशस्वी त्रिकूट' या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहे. हा एक कौटुंबिक ड्रामा (Family Drama) असून यात विहिणींमधील मजेशीर नातेसंबंधांवर भाष्य करण्यात आले आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरेल, यात शंका नाही.
महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात संग्रहालय फिरणार मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व ...
गेल्या काही काळापासून गंभीर भूमिकांमध्ये दिसलेल्या अभिनेत्री निर्मिती सावंत आता पुन्हा एकदा त्यांच्या लाडक्या विनोदी रूपात प्रेक्षकांसमोर येत आहेत. 'लाडकी विहीण योजना' या नव्या नाटकाद्वारे त्यांचा हा जबरदस्त विनोदी अवतार रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. याबद्दल बोलताना निर्मिती सावंत यांनी व्यक्त केले की, "प्रेक्षकांना आवडणारी विनोदी निर्मिती पुन्हा आणणे आणि ज्या 'अष्टविनायक' संस्थेने मला ओळख दिली, त्यांच्यासोबत पुन्हा काम करणे हा माझ्यासाठी सोन्याहून पिवळा योग आहे." या नाटकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याची निर्मिती केवळ दिलीप जाधवच नाही, तर स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक आणि संजय मेमाणे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी 'पंचशील एंटरटेन्मेंट'च्या माध्यमातून केली आहे. नुकतेच या नाटकाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्यात निर्मिती सावंत 'सेल्फी स्टिक' घेऊन सेल्फी काढताना दिसत आहेत. या हटके पोस्टरने सोशल मीडियावर चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढवली असून, राजेश देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली हे कौटुंबिक नाटक मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरेल, अशी खात्री निर्मात्यांनी दिली आहे.






