जळगाव: लहान मुलं काय करतील आणि काय नाही, याचा काही नेम नसतो. कधीकधी नकळत केलेल्या गोष्टी त्यांच्या जीवावरही बेतू शकतात. अशीच एक घटना जळगावात घडली आहे. साडेतीन वर्षांची चिमुकली सानिया आपल्या घरात खेळत असताना तिचं डोकं अॅल्युमिनिअमच्या एका अरुंद भांड्यात अडकलं. हे पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर डॉक्टरांनी एका प्लंबरच्या मदतीने अत्यंत कौशल्याने हे भांडं कापून काढलं आणि सानियाची त्यातून सुटका केली.
नेमकं झालं काय?
सानिया घरात खेळत असताना तिने गंमत म्हणून अॅल्युमिनियमचं एक भांडं डोक्यावर घेतलं. पण काही वेळातच ते भांडं तिच्या मानेपाशी घट्ट अडकलं. पालकांनी ते काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही. उलट सानिया वेदनेने रडू लागली. वेळ न घालवता पालकांनी तिला तशाच अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेलं.
डॉक्टरांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीने एका प्लंबरला बोलावून घेतलं. हे ऑपरेशन अत्यंत जोखमीचं होतं, कारण कटरचा वापर करताना चिमुकलीच्या डोक्याला किंवा मानेला इजा होण्याची भीती होती. सुरक्षा म्हणून सानियाच्या डोक्याला आणि भांड्याच्या मधे पुठ्ठा, प्लास्टिकचा तुकडा आणि रुमाल सरकवण्यात आला. प्लंबरने कटरच्या मदतीने भांड्याला चीर पाडण्यास सुरुवात केली. इकडे सानिया वेदनेने तळमळत होती, पण डॉक्टरांची टीम पालकांना धीर देण्याचे काम करत होती. कटरने भांड्याचा एक भाग कापून काढला, पकडीने भांडं वाकवलं, पण डोकं काही बाहेर येत नव्हतं.
अखेर डॉक्टरांनी सानियाला झोपवून भांड्याला दुसऱ्या बाजूने पुन्हा चीर पाडली. चौघांनी मिळून डोकं आणि भांडं विशिष्ट कोनात फिरवलं आणि अकरा मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर सानियाचं डोकं भांड्यातून सुरक्षित बाहेर आलं. सुटका होताच सानियाने आपल्या वडिलांना मिठी मारली. "त्या ११ मिनिटांत एक छोटीशी चूकही मोठी इजा करू शकली असती, पण सर्वांच्या सहकार्याने सानिया सुखरूप आहे," असे डॉक्टरांनी सांगितले.







