Thursday, February 19, 2026

Chhatrapati Sambhajinagar: पत्नी माहेरी न दिसल्याने पतीने थेट सासरवाडी गाठली अन्...

Chhatrapati Sambhajinagar: पत्नी माहेरी न दिसल्याने पतीने थेट सासरवाडी गाठली अन्...

छत्रपती संभाजीनगर: पत्नी माहेरी न दिसल्याने पती संतापला आणि थेट मध्यरात्री सासरवाडी गाठली. कौटुंबिक वादाच्या रागाने डोकं फिरल्याने त्याने घरावर दगडफेक करण्यात सुरुवात केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे परिसरात खळबळ उडाली.

मुकुंदवाडी परिसरातील समतानगर येथे राहणाऱ्या मंदा अंबादास खरात (वय ६५) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारी रोजी रात्री त्या पतीसह घरी होत्या. तेव्हा अचानक दरवाजा वाजवल्याचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांचा नातजावई संघर्ष बोर्डे व त्याचा मित्र महेश हेल्लोडे हे घराबाहेर उभे असल्याचे दिसले.

संघर्ष बोर्डे हा घरासमोर उभा राहून शिवीगाळ करत होता. तुम्ही माझी जिंदगी बरबाद केली आहे. तुम्ही माझ्या बायकोला का पाठवत नाही?’ असा सवाल त्याने केला. त्यावर मंदा खरात यांनी, "तुझा आणि तुझ्या पत्नीचा वाद कोर्टात सुरू आहे. कोर्टात जाऊन प्रश्न सोडव. मला विनाकारण इतक्या रात्री त्रास देऊ नको", असे सांगितले.

‎या उत्तरानंतर संतप्त झालेल्या संघर्ष बोर्डे आणि त्याचा मित्र महेश हेल्लोडे यांनी घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दोघांनी "तुम्हाला जिवंत सोडणार नाही, तसेच तुझ्या दोन्ही मुलांनाही जिवंत सोडणार नाही," अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. ‎दगडफेकीत घराच्या खिडक्यांच्या काचा आणि घरावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांचे नुकसान झाले. या घटनेत अंदाजे २५ ते ३० हजार रुपयांची हानी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

‎या प्रकरणी मंदा खरात यांच्या तक्रारीवरून नातजावई संघर्ष बोर्डे आणि त्याचा मित्र महेश हेल्लोडे या दोघांविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >