पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती (छत्रपती शिवाजी महाराज जयंती) गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी केली जाईल. अनेक मिरवणुका, महाराजांचे आणि मावळ्यांचे देखावे, पालख्या निघतील. जयंती अगदी सण असल्यासारखी संपूर्ण महाराष्ट्र साजरी केली जाणार आहे. यामुळे रस्त्यांवर, चौकांमध्ये अनेक लोक एकत्र जमलेले असतील. त्यामुळे वाहतुकीत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. ही अडचण होऊ नये म्हणून पुण्याच्या रस्ते वाहतुकीत काही महत्वाचे बदल केले गेले आहेत. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. सकाळी सातपासून सायंकाळी गर्दी निवळेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.
शिवाजी रस्ता
जिजामाता चौकातून शिवाजी रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनाही स. गो. बर्वे चौक- जंगली महाराज रास्ता- खंडुजीबाबा चौक- टिळक चौक- टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्याने फडके हौद चौक व जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.
केळकर रस्ता
केळकर रस्त्यामार्गे अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकामार्गे बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक सुरु असताना सोन्या मारुती चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील वाहने संत कबीर चौक (समर्थ विभाग ) मार्गे वळविण्यात येईल
पुरम चौक
पुरम चौकातून बाजीराव रस्त्यामार्गे शिवाजीनगराकडे जाणाऱ्या वाहनांनी पुरम चौक- टिळक रस्ता -अलका टॉकीज चौक - एफ सी रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. मिरवणूक सुरु झाल्यानंतर अप्पा बळवंत रस्त्यामार्गे सरळ पुढे वळविण्यात येईल. मिरवणुका गाडगीळ पुतळा पस होईपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पूल - बालगंधर्वकडे इच्छितस्थळी जातील.
मिरवणुका गाडगीळ पुतळा येथून पुढे जाईपर्यंत शनिवारवाड्याकडे जाणारी कॉसमॉस बँक जंक्शन - बालगंधर्व - टिळक पुलामार्गे वळविण्यात येईल. स.गो. चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी स.गो. चौक - जंगली महाराज रस्ता- झाशी राणी चौक येथून आपल्या ठिकाणी जावे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक वाहन वापर टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.





