Wednesday, February 18, 2026

‘शिवजयंती निमित्त, विलेपार्ले येथे शिवकल्याण राजा’

‘शिवजयंती निमित्त, विलेपार्ले येथे शिवकल्याण राजा’

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीतांचा भव्य कार्यक्रम

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ‘शिवकल्याण राजा’ या गाजलेल्या ध्वनिफितीला ५२ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने विशेष गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर स्वतः या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

‘शिवकल्याण राजा’ ही ध्वनिफीत शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारली असून, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केली आहे. स्व. लता मंगेशकर यांनी गायन केलेल्या या अमर काव्यकृतीने शिवभक्तांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. या ऐतिहासिक कलाकृतीच्या सुवर्णक्षणांचा पुनःअनुभव देण्यासाठी हा कार्यक्रम सादर होत आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. गायक-गायिका म्हणून विभावरी आपटे, मनीषा निश्चल, अजित परब आणि ऋतुजा तारे हे कलावंत आपल्या सुमधुर आवाजात शिवगौरव गीते सादर करणार आहेत. तसेच वादक कलाकारांमध्ये विवेक परांजपे, डॉ. राजेंद्र दुरकर , अजय अत्रे, अपूर्व द्रविड, सचिन इंगळे, केदार परांजपे, विशाल गंड्रतरवार, विक्रम भट आणि ऋतुराज कोरे यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम संयोजनाची जबाबदारी मंदार कार्णिक व प्रसाद महाडकर यांनी स्वीकारली आहे.

हा कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार आहे. प्रवेश विनामूल्य आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून शिवगौरव गीतांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >