नाशिक : अहिल्यानगरमधील भेसळयुक्त दूध रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता नाशिकमध्येही अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांचे भयंकर वास्तव समोर आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी एका विनापरवाना कुल्फी कारखान्यावर धडक कारवाई करत, केमिकल्स आणि इसेन्सचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या हजारो कुल्फ्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या नावाखाली लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एका कारखान्यात आरोग्यास घातक असलेल्या केमिकल्सचा वापर करून कुल्फी बनवली जात होती. पोलिसांनी या कारखान्यावर छापा टाकला असता, तिथे कोणताही परवाना नसताना आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर हानिकारक केमिकल्स आणि तयार साठा जप्त केला आहे. गेल्या आठवड्यात अहिल्यानगरमध्ये दूध भेसळ करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच नाशिकमधील हे कुल्फी प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या भेसळीमुळे नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही मुंबई : काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू ...
इगतपुरीत पोलिसांची मोठी कारवाई
उन्हाळ्याच्या चाहूल लागताच थंडगार कुल्फीची मागणी वाढते, याच संधीचा फायदा घेत लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इगतपुरीतील चर्च हिल परिसरातील एका जुन्या घरात सुरू असलेल्या 'केमिकल कुल्फी'च्या कारखान्यावर पोलिसांनी बेधडक छापा टाकला. मलाई कुल्फीच्या नावाखाली येथे चक्क घातक रसायनांचा वापर करून कुल्फ्या तयार केल्या जात असल्याचे समोर आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांना इगतपुरीच्या चर्च हिल भागात एका संशयास्पद कारखान्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला असता, तिथे जे दृश्य दिसले ते पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. सामान्यतः मलाई कुल्फीसाठी दूध आणि दुधाच्या सायचा वापर होणे अपेक्षित असताना, या कारखान्यात केवळ केमिकल आणि इसेन्सचा वापर करून कुल्फी बनवली जात होती. उन्हाळ्यात स्वस्तात कुल्फी विकून नफा कमावण्यासाठी अस्वच्छ वातावरणात आणि विनापरवाना हा उद्योग सुरू होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची सखोल शहानिशा केल्यानंतरच ही कारवाई केली. या छाप्यात हजारो तयार कुल्फ्या आणि त्या बनवण्यासाठी लागणारे हानिकारक केमिकल जप्त करण्यात आले आहे.
अडीच हजार बनावट कुल्फ्यांसह घातक केमिकल्स जप्त
मोठमोठ्या शहरांमध्ये 'मलाई कुल्फी' म्हणून आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थाचे धक्कादायक वास्तव नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघड केले आहे. इगतपुरी येथे केमिकल्सचा वापर करून मानवी शरीरास अत्यंत घातक ठरणारी कुल्फी बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २५०० तयार कुल्फ्या आणि केमिकल्सचे डबे जप्त करत अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) मदतीने कारखान्याचे पितळ उघड पाडले आहे. या कारखान्यात तपासणी केली असता, मलाई किंवा दुधाचा लवलेशही आढळला नाही. त्याऐवजी मानवी आरोग्याला हानी पोहोचवणारे 'कोबिंद कलर पोस्टर', विविध प्रकारचे 'इसेन्स' आणि 'फ्लेवर कलर्स' यांचा वापर करून कुल्फ्या तयार केल्या जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. केवळ नफ्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कारखान्यावर पोलिसांनी तातडीने झडती घेऊन सर्व साहित्य ताब्यात घेतले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाला पाचारण केले. इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. शहरांमधील चकचकीत वेष्टनात मिळणारी मलाई कुल्फी प्रत्यक्षात कशाप्रकारे बनवली जाते, हे या कारवाईमुळे समोर आले आहे.
मुलांच्या हातातील कुल्फी म्हणजे 'विष' तर नाही ना?
इगतपुरीतील केमिकल कुल्फी कारखान्यावर छापा टाकल्यानंतर आता पोलिसांनी कारवाईचा बडागा उगारला आहे. विनापरवाना कारखाना चालवून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या विनोद कुशवाह या संशयितावर इगतपुरी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने अन्न भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी पालकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. दुधाच्या वाढत्या किमती पाहता, अस्सल दूध आणि मलाईपासून बनलेली कुल्फी ५ किंवा १० रुपयांना मिळणे अशक्य आहे. मात्र, स्वस्त मिळते म्हणून नागरिक अशा कुल्फ्यांची खरेदी करतात. "पालकांनी आपल्या मुलांना कुल्फीच्या नावाखाली आपण 'विष' तर खाऊ घालत नाही ना? याचा गांभीर्याने विचार करावा," असे भावनिक आणि कडक आवाहन पोलिसांनी केले आहे. बाजारातील किमती आणि कुल्फीच्या किमतीतील तफावत हाच भेसळीचा सर्वात मोठा पुरावा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या २५०० बनावट कुल्फ्या आणि जप्त केलेले केमिकल्सचे नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) मदतीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संशयितावर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे







