Wednesday, February 18, 2026

शिवम दुबेचे अर्धशतक, भारताने नेदरलँडला दिले एवढे मोठे आव्हान

शिवम दुबेचे अर्धशतक, भारताने नेदरलँडला दिले एवढे मोठे आव्हान

अहमदाबाद : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरलेला भारत निव्वळ औपचारिकता म्हणून नेदरलँड विरुद्धचा साखळी सामना खेळत आहे. अहमदाबादच्या मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने २० षटकांत ६ बाद १९३ धावा केल्या. नेदरलँडला २० षटकांत १९४ धावा करण्याचे आव्हान दिले. भारताकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३१ चेंडूत ६ षटकार आणि ४ चौकार मारत ६६ धावा केल्या. तो लोगान व्हॅन बीकच्या चेंडूवर बदली खेळाडू म्हणून आलेल्या टिम व्हॅन डर गुगटेनकडे झेल देऊन परतला.

आजारपणातून उठलेला अभिषेक शर्मा आधी पाकिस्तान आणि आता नेदरलँड विरुद्ध शून्यावर बाद झाला. याआधी तो यूएई विरुद्धच्या साखळी सामन्यातही शून्यावर बाद झाला होता. ईशान किशनने ७ चेंडूत १ षटकार आणि २ चौकार मारत १८ धावा केल्या. आभिषेक आणि ईशानला आर्यन दत्तने त्रिफळाचीत केले. तिलक वर्माने २७ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत ३१ धावा केल्या. लोगान व्हॅन बीकच्या चेंडूवर रोएलॉफ व्हॅन डेर मेरवेने त्याला झेलबाद केले.

कर्णधार सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत १ षटकार आणि २ चौकार मारत ३४ धावा केल्या. काइल क्लेनच्या चेंडूवर बदली खेळाडू म्हणून आलेल्या टिम व्हॅन डर गुगटेनने त्याला झेलबाद केले. हार्दिक पांड्याने २१ चेंडूत ३ षटकार मारत ३० धावा केल्या. त्याला लोगान व्हॅन बीकच्या चेंडूवर रोएलॉफ व्हॅन डेर मेरवेने झेलबाद केले. रिंकु सिंगने ३ चेंडूत १ षटकार मारत नाबाद ६ धावांचे योगदान दिले. नेदरलँडकडून लोगान व्हॅन बीकने ३, आर्यन दत्तने २ आणि काइल क्लेनने १ विकेट घेतली.

Comments
Add Comment