Wednesday, February 18, 2026

मुंबई-मार्सेलिस दरम्यान उभारणार नवा आर्थिक 'सेतू' - महाराष्ट्र आणि फ्रान्सच्या 'पाका' प्रांतात सामंजस्य करार

मुंबई-मार्सेलिस दरम्यान उभारणार नवा आर्थिक 'सेतू' - महाराष्ट्र आणि फ्रान्सच्या 'पाका' प्रांतात सामंजस्य करार

वीर सावरकरांच्या स्मृतींनी पावन झालेल्या भूमीशी जोडले जाणार नाते

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या मार्सेलिस बंदरात ऐतिहासिक उडी मारून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते, त्याच मार्सेलिस शहराशी आता महाराष्ट्राचे आर्थिक आणि सांस्कृतिक नाते अधिक घट्ट होणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्र आणि फ्रान्समधील 'प्रोव्हन्स-आल्प्स-कोत देझ्युर' (पाका) या प्रांतादरम्यान एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 'पाका' प्रांताचे अध्यक्ष रेनॉड म्युसेलिअर यांनी या करारावर स्वाक्षरी केली असून, यामुळे मुंबई आणि मार्सेलिस या दोन शहरांदरम्यान एक भक्कम 'आर्थिक सेतू' उभारला जाणार आहे.

या कराराविषयी माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या संकल्पनेतील भारत-फ्रान्स संबंधांना अधिक बळकट करण्यासाठी हा प्रादेशिक करार करण्यात आला आहे. या भागीदारीमुळे जेएनपीटी आणि मार्सेलिस-फॉस बंदरादरम्यान सागरी कनेक्टिव्हिटी वाढणार असून, 'ब्लू इकॉनॉमी' (सागरी अर्थव्यवस्था), अक्षय ऊर्जा, आरोग्य, जैवतंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण परिसंस्था या क्षेत्रांना मोठी चालना मिळेल.

येणारे २०२६ हे वर्ष 'भारत-फ्रान्स नाविन्यपूर्ण वर्ष' म्हणून साजरे केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि 'पाका' प्रांत गुंतवणूक, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि शाश्वत विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करतील. यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, ज्या मार्सेलिस बंदराशी हा व्यापारी करार होत आहे, त्याच बंदराच्या किनाऱ्यावर ८ जुलै १९१० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बोटीतून उडी मारून अफाट शौर्य गाजवले होते. या करारामुळे या ऐतिहासिक भूमीशी महाराष्ट्राचे आधुनिक व्यापार संबंध प्रस्थापित होत आहेत, हे विशेष.

महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे कौतुक - रेनॉड म्युसेलिअर

'पाका' प्रांताचे अध्यक्ष रेनॉड म्युसेलिअर यांनी या कराराचे स्वागत करताना महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे कौतुक केले. "१२० दशलक्ष लोकसंख्या आणि १० टक्के विकासदर असलेल्या महाराष्ट्र राज्यासोबत सहकार्य करणे, हा भारत आणि फ्रान्समधील दृढ संबंधांचा एक शक्तिशाली संदेश आहे," असे त्यांनी यावेळी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >