मुंबई: राज्यातील जलवाहतूक क्षेत्र अधिक अत्याधुनिक आणि वेगवान करण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पावले उचलली असून, स्वीडनमधील जागतिक दर्जाची तंत्रज्ञान कंपनी ‘कँडेला’ महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्यास सज्ज झाली आहे. हायड्रोफॉईल तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक बोटींच्या निर्मिती आणि गुंतवणुकीसंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत हायड्रोफॉईल तंत्रज्ञानावर आधारित पर्यावरणापूरक आणि वेगवान जलवाहतूक बोटींच्या कराराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याचा विचार करता, प्रवाशांना कमी वेळात आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या अत्याधुनिक बोटींची मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात मोठी परकीय गुंतवणूक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
📍१७ फेब्रुवारी २०२६ | मंत्रालय, मुंबई स्वीडनमधील कँडेला (Candela) या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधींसमवेत विदेशी (FDI) गुंतवणुकीसंदर्भात आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. हायड्रोफॉईल तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक जलवाहतूक बोटींच्या… pic.twitter.com/IB70uDAXED
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 17, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होणार अवलंब:
- बैठकीदरम्यान राज्यात जलवाहतूक क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि शाश्वत जलवाहतूक व्यवस्था उभारणे अशा विविध विषयांवर मंत्री नितेश राणे यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
- या बैठकीला ‘कँडेला’ कंपनीचे संस्थापक आणि सीईओ मिस्टर गुस्ताव हॅसेल्स्कॉग, मुख्य व्यावसायिक अधिकारी नकुल विराट, इक्लाईन फायनान्सचे वित्त संचालक अंशुल दवानी, रुलर एनहान्सर्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अंबर आयदे आदी मान्यवर उपस्थित होते.






