नवी दिल्ली: महाराष्ट्राची लाडकी आणि भारताची सुपरस्टार उपकर्णधार स्मृती मानधना हीचा बीबीसी कडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. स्मृतीला २०२५ साठी बीबीसी 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
भारतीय महिला संघाने २०२५ साली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाच्या या विजयात स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने महत्त्वाची अशी कामगिरी बजावली होती. त्यामुळेच स्मृती मानधना ही 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर' पुरस्काराची मानकरी ठरली. सोमवारी (१६ फेब्रुवारी) दिल्लीत पार पडलेल्या भव्य सोहळ्यात बीबीसी पुरस्काराच्या मानकऱ्यांना गौरवण्यात आले आहे.
A year to remember. An honour to match. 🌟 2025 belonged to Smriti Mandhana. Runs, records, leadership, silverware… she did it all. A year written in 𝗕𝗢𝗟𝗗. ❤️🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/hBLf7eObNA
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 17, 2026
स्मृती मानधना ही सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. परदेशात असल्यामुळे ती कालच्या या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही. मात्र तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल बीबीसीचे आभार मानले. भारतीय महिला क्रिकेटसाठी २०२५ हे वर्ष खूपच खास राहिले. भारतीय संघाच्या विश्वचषक विजयात मी योगदान देऊ शकले, याचा मला आनंद असल्याची भावना स्मृती मानधना हिने यावेळी बोलून दाखवली.
स्मृती सोबतच बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर (उदयोन्मुख खेळाडू) म्हणून बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख, बीबीसी पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर म्हणून पॅरा-अॅथलीट प्रीती पाल आणि बीबीसी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणून नेमबाज अंजली भागवत यांना गौरण्यात आले.







