पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील ब्रेमेन चौक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील कॉसमॉस बँक येथील यू-टर्न वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिसरात दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालकांना प्रचंड मन:स्ताप होतो. त्यामुळे अपघातप्रवण आणि सतत कोंडी होणाऱ्या ठिकाणी पुरेसे वाहतूक पोलिस नेमण्याची, तसेच गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
गणेशखिंड रस्ता, ब्रेमेन चौक आणि एनसीएल परिसरात सकाळी आणि सायंकाळी वाहनांची मोठी वर्दळ असते. विशेषतः कॉसमॉस बँकेजवळील यू-टर्नवरून सेनापती बापट रस्त्याकडे वळताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. या ठिकाणी दुचाकी, चारचाकी आणि सार्वजनिक वाहतुकीची वाहने एकाच वेळी वळण घेत असल्याने गोंधळ निर्माण होतो. अनेक चालक घाईत वळण घेत असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. काही वाहनचालक विरुद्ध दिशेने येत असल्याने पादचाऱ्यांसाठीही हा परिसर अधिकच धोकादायक ठरत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.







