एमटीडीसी’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष लोगोचे अनावरण
सुवर्णमहोत्सवी कॅलेंडर व डायरीचे प्रकाशन
मुंबई: ‘एमटीडीसी’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटनाला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) च्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.
यावेळी खनिकर्म विभागाच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनायाचे सह संचालक संतोष जाधव, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे व पर्यटन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री शंभूराज देसाई यावेळी म्हणाले की, पर्यटन विभागांतर्गत १९७५ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) ने गेल्या पाच दशकात राज्यातील पर्यटन विकासात मोलाचे योगदान दिले आहे. पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्मिती, सेवा सुविधा उपलब्ध करून देणे आणि महाराष्ट्र पर्यटनाचा व्यापक प्रचार-प्रसार करणे, या माध्यमातून महामंडळाने राज्याच्या पर्यटन वृद्धीत भक्कम भूमिका बजावली आहे. ‘एमटीडीसी’चा हा लोगो ‘एमटीडीसी’च्या ५० वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा तसेच महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण पर्यटन वारशाचे प्रतीकात्मक आविष्कार आहे तसेच एमटीडीसीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त खास तयार करण्यात आलेली दिनदर्शिका व दैनंदिनी देखील पर्यटकांसाठी उपयुक्त आहे असेही पर्यटनमंत्री देसाई म्हणाले.
सुवर्णमहोत्सवाच्या लोगोची संकल्पना:
‘एमटीडीसी’चा हा लोगो ‘एमटीडीसी’च्या ५० वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा, तसेच महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण पर्यटन वारशाचे प्रतीकात्मक आविष्कार आहे. लोगोमध्ये ठळक स्वरूपात दिसणारा “५०” हा आकडा महामंडळाच्या पाच दशकांच्या उल्लेखनीय कार्याची साक्ष देतो. लोगोमध्ये ऐतिहासिक किल्ले, वास्तुशिल्पीय वारसा, सांस्कृतिक स्थळे व आधुनिक पर्यटन तसेच पायाभूत सुविधांचे प्रतीकात्मक दर्शन घडते. समुद्राच्या लाटा व नौकेचे चित्रण राज्याच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याचे व सागरी पर्यटन क्षमतेचे प्रतीक आहे. वृक्ष व पानांची रचना ही पर्यावरणपूरक व शाश्वत पर्यटन विकासासाठी असलेली बांधिलकी दर्शविते. वन्यजीवांचे प्रतीक जैवविविधता व साहसी पर्यटन संधींचे प्रतिनिधित्व करते.
विविधरंगी ग्रेडिएंट डिझाईन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्य, उत्साह व प्रगतिशील दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. शीर्षस्थानी असलेले महामंडळाचे अधिकृत चिन्ह ‘त्रिमूर्ती’ १९७५ पासूनच्या समृद्ध परंपरेचे स्मरण करून देते.
सुवर्णमहोत्सवी कॅलेंडर व डायरीचे प्रकाशन:
‘एमटीडीसी’च्या दिनदर्शिकेमध्ये महामंडळाच्या अखत्यारीतील निवडक पर्यटक निवास, तसेच महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळांची आकर्षक छायाचित्रे व संक्षिप्त माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. दैनंदिनीमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षाची संकल्पना, महामंडळाद्वारे परिचलनात असलेल्या पर्यटक निवास व उपहारगृहांची यादी, त्यांची छायाचित्रे व माहिती, ‘आई’ उपक्रम तसेच अमूर्त सांस्कृतिक वारसा यांसारख्या पर्यटन संवर्धनाशी निगडित उपक्रमांचा आढावा आणि महामंडळाच्या कार्याचा संक्षिप्त परिचय समाविष्ट करण्यात आला आहे.







