Tuesday, February 17, 2026

Emmanuel Macron India Visit: भारत-फ्रान्स धोरणात्मक संबंधांचा नवा अध्याय

Emmanuel Macron India Visit: भारत-फ्रान्स धोरणात्मक संबंधांचा नवा अध्याय

- मुंबईत मोदी-मॅक्रोन यांच्यात द्विपक्षीय बैठक; टाटा-एअरबस हेलिकॉप्टर प्रकल्पाचे उद्घाटन

मुंबई : भारत आणि फ्रान्समधील संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंधांना नवे बळ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी मंगळवारी ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी’ची घोषणा केली. मुंबईतील राजभवनात झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी कर्नाटकातील वेमगल येथे उभारण्यात आलेल्या टाटा-एअरबसच्या (एच १२५) लाइट युटिलिटी हेलिकॉप्टरच्या 'फायनल असेंबली लाइन'चे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले.

या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत आणि फ्रान्स मिळून माऊंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत उड्डाण करू शकणारे हेलिकॉप्टर भारतात तयार करतील आणि ते संपूर्ण जगाला निर्यात केले जाईल, याचा आम्हाला अभिमान आहे. संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्पादनक्षमता वाढवण्यावर दोन्ही देशांचा भर राहील", असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘भारत-फ्रान्स नवनिर्मिती वर्ष’ (इनोव्हेशन इयर) सुरू झाल्याची घोषणा करत पंतप्रधानांनी ही धोरणात्मक भागीदारी आता ‘जनतेची भागीदारी’ बनत असल्याचे सांगितले. स्टार्टअप, एमएसएमई, विद्यार्थी आणि संशोधक यांच्यातील देवाणघेवाण वाढवण्यासाठी नवीन केंद्रे स्थापन केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य क्षेत्रासाठी ‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर एआय’, ‘डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर’ आणि एयरोनॉटिक्समधील कौशल्यविकासासाठी ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स’ स्थापन करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि फ्रान्सची भागीदारी ही जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाची शक्ती ठरेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला. २०२६ हे वर्ष भारत-युरोप संबंधांसाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरेल, असा आशावादही पंतप्रधानांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन आपल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यात गुरुवारी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणींना उजाळा:

राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी फ्रान्समधील मार्सेलिस या बंदराचा विशेष उल्लेख केला. मोदी म्हणाले, “गेल्या वर्षी मी फ्रान्स दौऱ्यावर असताना मार्सेलिसला भेट दिली होती. याच शहरातून पहिल्या महायुद्धादरम्यान भारतीय सैनिक युरोपमध्ये दाखल झाले होते. तसेच, याच समुद्रकिनारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ऐतिहासिक उडी मारली होती”, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

Comments
Add Comment