मुंबई(विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती सदस्यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी महापालिका सभागृहात करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती न करता उबाठाने आजवरच्या प्रथा परंपरेलाच छेद दिला असून एकप्रकारे उबाठाने पेडणेकर यांच्यावर या माध्यमातून अविश्वासच दाखवला आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आता कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष असून भाजप पुन्हा एकदा प्रस्थापित व्यक्तीऐवजी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २० फेब्रुवारी रोजी होणार असून यासाठी येत्या १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या दोन्ही समित्यांवर सदस्यांची नावे प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी महापौरांना बंद लिफाफ्यात सादर केली. त्यानुसार या लिफाफ्यातील नावे महापौरांनी जाहीर करून त्यांची स्थायी आणि शिक्षण समितीवर नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिंदे, नार्वेकर, भांदिर्गे यांच्यात स्पर्धा
स्थायी समितीवरील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली असून भाजपने शितल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रिती सातम, तेजिंदर तिवाना आदींना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने प्रभाकर शिंदे, ऍड मकरंद नार्वेकर आणि हरिष भांदिर्गे यांच्यात स्पर्धा आहे.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असे घडले
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना उबाठाने स्थायी समिती सदस्यपदी डावलले आहे. महापालिकेत नियम नसला तरी आजवरच्या प्रथा आणि परंपरेनुसार विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीत स्थान दिले जाते. परंतु प्रथमच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीमध्ये डावलले गेले आहे. महापौरपदाच्या कालावधीमध्ये ज्याप्रकारे पेडणेकर यांनी केलेला कारभार आणि भाजपकडून होत असलेले आरोप पाहता उबाठाने पेडणेकर यांना या महत्वाच्या समितीतून बाहेर केले असल्याचे बोलले जात आहे. आजवरच्या महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडत असले तरी मी स्वत: हे पद न घेवून या समिती सदस्यपदी पक्षाच्या एका सदस्याची वर्णी लावली असल्याचे किशोरी पेडणकर यांनी स्पष्ट केले.
स्थायी समिती:
भाजप: गणेश खणकर, प्रभाकर शिंदे,राखी जाधव, अॅड. मकरंद नार्वेकर, हरिष भांदिर्गे, शिवकुमार झा, शितल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रिती सातम, तिवाना ताजिंदरसिंग
शिवसेना: अमेय घोले,यामिनी जाधव, अंजली नाईक,डॉ सईदा खान
उबाठा : श्रध्दा जाधव, यशोधर फणसे, दिपमाला बढे, लक्ष्मी भाटीया, रमाकांत रहाटे, टी जगदीश, मिनाक्षी पाटणकर
काँग्रेस: अश्रफ आझमी, तुलीप मिरांडा, अजंता यादव
एमआयएम: कुरेशी जमिरी
मनसे : यशवंत किल्लेदार
शिक्षण समिती:
भाजप: राजेश्री शिरवडकर, स्वप्ना म्हात्रे, सुषम सावंत, शिवानंद (शिवा) शेट्टी,योगिता कोळी, डॉ. नील किरीट सोमैया , रोहन राठोड, पिल्ले श्रीकला , राजपूत विक्रम , बिगर मनपा सदस्य: निखिल व्यास, योजना ठोकळे
शिवसेना:अंजली नाईक, वर्षा टेंबवलकर,धनश्री भरडकर, बिगर मनपा सदस्य चंद्रावती मोरे
उबाठा: अंकित प्रभू, गीता भंडारी,पुजा महाडेश्वर, चित्रा सांगळे, सोनाली साबे, प्रमोद सावंत, सोनाली साबे
काँग्रेस: कॅरेन डिमेलो, कमरजहाँ सिद्दीकी, बिगर मनपा सदस्य प्रियंका राऊत,
एमआयएम : मेहजाबीन अतिक अहमद
मनसे : ज्योती राजभोज







