मुंबई: खगोलशास्त्र आणि धार्मिक परंपरांमध्ये रस असणाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष विशेष महत्त्वाचं ठरणार आहे. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असून, खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी हे सूर्यग्रहण होणार असून, ते माघ अमावस्येच्या दिवशीच पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे, ज्यामुळे खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातूनही या घटनेला मोठं महत्त्व आहे.
ग्रहणाची वेळ आणि स्वरूप
पंचांगानुसार, सूर्यग्रहणाची सुरुवात दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी होईल, तर सायंकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत हे ग्रहण चालू राहील. खगोलतज्ज्ञांच्या माहितीनुसार, हे ग्रहण अंटार्क्टिका, आफ्रिकेतील काही भाग आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या परिसरात स्पष्टपणे दिसणार आहे. परंतु भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याने देशात सुतक काळ लागू होणार नाही.
आरोग्य आणि आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी ज्योतिषीय मान्यतेनुसार, ग्रहण काळात आरोग्य व आर्थिक विषयांमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक मानलं जातं. या काळात निष्काळजीपणा केल्यास शारीरिक त्रास किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक निर्णय, गुंतवणूक किंवा व्यवहार करण्यापूर्वी सखोल विचार करणं हिताचं ठरतं. घरातील ज्येष्ठांचा सल्ला न घेता किंवा परिस्थितीचा अंदाज न बांधता निर्णय घेणं टाळावं.
ग्रहण काळात काय करावं?
धार्मिक परंपरांनुसार, ग्रहण काळात मंत्रजप करणं शुभ मानलं जातं. सूर्य मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मानसिक शांतता मिळते, असं मानलं जातं. सकारात्मक विचार ठेवणं, ध्यानधारणा करणं आणि शांततेत वेळ घालवणं या काळात लाभदायक ठरू शकतं. ग्रहण संपल्यानंतर स्नान करणं आणि दानधर्म करणंही शुभ समजलं जातं.
काय टाळावं?
ग्रहण काळात स्वयंपाक करणं किंवा अन्नपदार्थांचं सेवन करणं टाळण्याची प्रथा आहे. तसेच वादविवाद, नकारात्मक चर्चा आणि तणावपूर्ण गोष्टींपासून दूर राहणं आवश्यक आहे. कोणतेही मोठे निर्णय, करार किंवा नवीन कामाची सुरुवात या काळात टाळावी. तसेच गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी विशेष खबरदारी घेणं गरजेचं मानलं जातं. या काळात तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरणं टाळावं, तसेच अनावश्यक श्रम करू नयेत. मानसिक शांतता राखणं आणि सकारात्मक वातावरणात राहणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं.







