यावर्षीच्या टी २० विश्वचषकाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. एकाच दिवसात ३ खेळाडूंनी या स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. खुद्द आयसीसीने याची माहिती दिली आहे.
आयसीसीने म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड, नामिबियाचा बेन शिकोंगो आणि स्कॉटलंडचा सफयान शरीफ यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. विविध दुखापतींमुळे हे तिन्ही क्रिकेटपटू २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यांच्या जागी बदली क्रिकेटपटूंची घोषणाही करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हेझलवूडने पायाच्या दुखापतीमुळे अधिकृतपणे २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. ऑक्टोबर २०२५ मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता आणि त्यानंतर अॅशेस मालिकेमधूनही तो खेळू शकला नव्हता. तो टी२० विश्वचषकासाठी तंदुरुस्त होईल अशी आशा होती आणि म्हणूनच त्याला संघात स्थान देण्यात आले होते. पण तो तंदुरुस्त होऊ शकला नाही आणि त्याची जागा स्टीव्ह स्मिथने घेतली.
अॅलेक्स वोल्शेंकने नामिबियाच्या संघात शिकोंगोची जागा घेतली आहे. २० वर्षीय या क्रिकेटपटूने आतापर्यंत फक्त पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २६ धावा केल्या आहेत आणि चार विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये अमेरिकेविरुद्ध पदार्पण केले होते. १२ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात शिकोंगोला उजव्या मांडीला दुखापत झाली होती. नामिबिया सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर पाकिस्तानविरुद्ध एक सामना शिल्लक आहे.
स्कॉटलंडने जलदगती गोलंदाज शरीफला कंबरेला दुखापत झाल्यामुळे या स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे. १२ फेब्रुवारी रोजी सराव करताना त्याला ही दुखापत झाली. स्कॉटिश संघाने शरीफच्या जागी जॅक जार्विसला संघात घेतले आहे. जार्विस संघासोबत प्रवासी राखीव क्रिकेटपटू म्हणून होता. त्याने आतापर्यंत आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि ११ विकेट्स घेतल्या आहेत. स्कॉटलंडचे अजूनही दोन गट सामने शिल्लक आहेत.







