Monday, February 16, 2026

Narhari Zirwal: लाचखोरी प्रकरणाची गंभीर दखल; राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड

Narhari Zirwal: लाचखोरी प्रकरणाची गंभीर दखल; राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामधील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाच घेताना पकडलेल्या लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. संबंधित लिपिकाची केवळ चौकशीच नव्हे, तर त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विभागातील दक्षता पथकाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लिपिक राजू ढेरिंगे याच्याविरुद्ध वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

लाच घेणारा कर्मचारी राजेंद्र ढेरिंगे याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी एसीबीने राजेंद्र ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची झडती घेतली. या घरातून एसीबीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आता आणखी नवीन माहिती समोर येणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

राजेंद्र ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहे. वर्षभरापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभाग येथे तो प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आता राजेंद्र ढेरिंगेच्या घरातून एसीबीच्या हाती जी कागदपत्रे लागली आहेत त्यामुळे चौकशीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. आज ही कागदपत्रं न्यायालयासमोर सादर केली जाऊ शकतात. तेव्हा एसीबीचे अधिकारी एखादी स्फोटक माहिती न्यायालयात सांगणार का, हे बघावे लागणार. राजेंद्र ढेरिंगे याच्या लाचखोरीचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून अज्ञातवासात असलेल्या मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हालचालींनाही वेग आल्याची माहिती आहे. नरहरी झिरवळ यांचा फोन सध्या स्वीच ऑफ आहे. ते आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरिंगे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी त्याने ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी िझरवाळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवाळ यांचं कार्यालय पूर्ण ताब्यात घेतले. तपास झाल्यानंतर मग या संबंधित लिपिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय उघडण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >