संवाद : गुरुनाथ तेंडुलकर
तुम्हाला ही गोष्ट नक्कीच ठाऊक आहे. एक धोबी आणि त्याचा मुलगा शहरातल्या आठवड्याच्या बाजारात गाढव खरेदी करायला गेले. येताना सटरफटर अशी इतरही बरीच खरेदी झाली. त्या वजनाची थैली मुलाने डोक्यावर घेतली आणि बापाने गाढवाच्या गळ्यातली दोरी धरून चालायला सुरुवात केली. दुपार झाली होती. अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. दोघंही पार थकले होते. वाटेत एकजण ओळखीचा भेटला नि म्हणाला, ‘एवढं गाढव असून तुम्ही दोघं पायी चालताय...? तुम्हीच खरे गाढव आहात...’ बाप मुलाला म्हणाला, ‘तू सामान घेऊन गाढवावर बस. मी चालतो.’त्यांना तसं चालताना पाहून आणखी दोन जण म्हणाले. ‘काय दिवस आलेत? तरणाताठा मुलगा गाढवावर बसलाय आणि म्हातारा बाप पायी चालतोय.’मुलगा उतरला आणि बाप गाढवावर बसला. आता लोक म्हणू लागले. ‘बाप एकटाच आरामात बसलाय. पोरगा बिचारा चालतोय... चालतोय.’त्यानंतर दोघेही गाढवावर बसले तर लोक म्हणू लागले ‘की काय माज आलाय बाप-लेकाला... त्या मुक्या प्राण्यावर दोघं-दोघं बसलेत. त्या बिचाऱ्या गाढवाचे किती हाल होताहेत...’अखेरीस लोकांच्या या उलटसुलट बोलण्याला कंटाळून त्या बापलेकांनी गाढवाला आडवा पाडून त्याच्या पायाला लांब बांबू बांधला आणि त्याला उलटा उचलून घेऊन चालायला सुरुवात केली. गाढवाची ही अजब यात्रा पाहून आजूबाजूचे खूपसारे लोक गोळा झाले. शिट्या टाळ्या वाजवू लागले. गाढव बिथरलं. पाय झाडू लागलं. एव्हाना ही पालखी नदीवरच्या पुलावरून चालली होती. गाढवाने पाय झाडून बांधलेल्या दोऱ्या तोडल्या आणि त्या गडबडीत गाढव नदीत पडलं. वाहून गेलं. रिकामा पोकळ बांबू घेऊन बापलेक घरी परतले. आमच्या शाळेच्या क्रमिक पुस्तकात आम्हाला ही गोष्ट होती.
माझ्या जवळच्या एका मित्राची विवाहित मुलगी लग्नापूर्वी गाणं शिकली होती. लग्नानंतर मात्र तिचं गाणं बंद पडलं, पण अलीकडेच तिला तिच्या क्लासमधल्या सरांनी बोलावून घेतलं आणि तिच्या आवाजात काही गाणी रेकॉर्ड केली. त्यानंतर तिची अमेरिकेतील एका शोसाठी निवड देखील झाली. पण तिनं ती संधी नाकारली. कारण काय तर म्हणे तिच्या म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांकडे बघायला कोणी नव्हतं. थोरली जाऊबाई नोकरी करणारी होती. धाकटी नणंद कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. अशा अनेक अडचणींचे अडथळे मार्गात उभे राहिले. अशावेळी नवऱ्यानं थोडं प्रोत्साहन द्यायला हवं होतं. सासू-सासऱ्यांनी देखील थोडा समजूतदारपणा दाखवायला हवा होता. पण... पण जवळच्या नातेवाइकांनी तिचे पायच ओढले. ‘तू काय स्वतःला लता मंगेशकर समजतेस की आशा भोसले?’ बिचारी हिरमुसली आणि स्वतःच्या मनापेक्षा जनांचं ऐकून गप्प बसली.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला आजूबाजूला दिसतील. एवढंच कशाला आपणदेखील असेच लोकांचा विचार करूनच वागतो. आजूबाजूचे चार लोक काय म्हणतील याचा विचार करून स्वतःचा आतला आवाज दाबून टाकतो.
आणखी एक घटना सांगतो. दहा वर्षांपूर्वी माझ्या एक नातेवाईक बाईचा नवरा अपघातात अचानक गेला. नवरा गेला त्यावेळी त्या बाईंनी नुकतीच साठी ओलांडली होती. दोन्ही मुलं परदेशात स्थायिक, अशावेळी तिच्याच परिचयातील एका गृहस्थानी सहा महिन्यांनंतर तिला चक्क लग्नासाठी विचारलं. ते देखील साधारण तिच्याच वयाचे. त्यांचीही पहिली पत्नी दीर्घ आजारानंतर वारली होती. ते मुंबईत एकटेच राहात होते. विवाहित मुलगी बंगलोरला आयटी कंपनीत होती. मुलीनंच पुढाकार घेतला आणि या बाईना आपल्या वडिलांबरोबर लगाबद्दल विचारलं... त्या बाईंनादेखील हा प्रस्ताव मनातून पटत होता. उरलेलं आयुष्य एकाकी काढण्यापेक्षा परिचयातलाच माणूस जर सहचारी म्हणून लाभला तर आयुष्याच्या उत्तरायणातील सहजीवन नक्की सुखावह होईल हे त्या बाईंनादेखील पटत होतं. त्या गृहस्थांच्या मुलीनं खूप समजावलं. मीदेखील त्यांच्याशी बोललो. पण... पण... ‘या वयात लग्न...? लोक काय म्हणतील...?’ ‘ज्या वयात केसांना मेहंदी लावायची त्या वयात हाताला मेहंदी लावणं शोभेल का?’ असा विचार करून त्या बाईनी नकार दिला... त्यानंतर त्या गृहस्थांनी त्यांच्याच ओळखीच्या दुसऱ्या एका स्त्रीशी विवाह केल्याचं समजलं, आता या घटनेला बरीच वर्षे होऊन गेली आहेत. अलीकडे एका समारंभात त्या बाई मला भेटल्या. बोलता बोलता त्यांनी ‘जनांचं ऐकून स्वतःच्या नाकारल्याबद्दल’ अत्यंत प्रांजळपणे कबुली दिली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते...
तुमच्या पाहण्यात, ऐकण्यातदेखील अशा प्रकारची काही उदाहरणं आढळतील. एखाद-दुसरं उदाहरण तर कदाचित आपल्याच आयुष्यातलंदेखील असेल. खरंय ना? म्हणूनच हिंदीत एक म्हण आहे. ‘सबसे बड़ा रोग... क्या कहेंगे लोग?’ लोक काय म्हणतील? त्यांना काय वाटेल? केवळ लोकांच्या मनाचाच विचार केल्यामुळे आपल्या स्वतःच्या मनाची विचार करण्याची शक्तीच हळूहळू हरवून जाते. स्वतःचं मन स्वतःच्या ताब्यात न राहता इतरांच्या ताब्यात जातं. विचार परावलंबी होतात... आयुष्य प्रवाहपतित होतं. आपण लोकांच्या विचारांबरोबर भरकटत वाहत जातो. वास्तविक खरं तर लोकांना कशाचंच सोयरसुतक नसतं. त्यांना केवळ बोलायचं तेवढंच ठाऊक असतं. बोलणारे लोक कधीही मदतीला धावून येत नाहीत आणि मदत करणारे कधीही समोरच्याचं मन खची होऊ देत नाहीत...बोलणारे लोक बोलले तरी ते किती दिवस बोलतील...? दोन दिवस... चार दिवस... बस्स... त्यानंतर त्यांना दुसऱ्या कुणाचा तरी नवीन विषय सापडतो आणि ते त्याच्यावर बोलतात... आपण मात्र हाताशी आलेली चांगली संधी गमावून बसतो. याच पार्श्वभूमीवर आजची कविता. कवी आहेत आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे. भा रा तांबे आणि कविता देखील सगळ्यांच्या परिचयाचीच आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय... म्हणूनच कोणतंही काम करताना आपल्या मनाचा कौल घ्यायचा. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून फक्त आतला आवाज ऐकायचा... हा ज्यांनी लोकांचा विचार न करता फक्त आतला आवाज ज्यांनी ऐकला त्यांनी इतिहास घडवल्याची अनेक उदाहरणं आहेत.
आनंदीबाई जोशी... लोक काय म्हणतील याची पर्वा न बाळगता नेटानं शिकल्या. डॉक्टर झाल्या. इतरांसारखी नोकरी एके नोकरी नाकारून स्वतःच्या मनाचा कौल घेणारे धीरुभाई अंबानी. ‘विधवेसोबत लग्न केलं तर लोक काय म्हणतील?’ असा विचार न करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे. स्त्रीयांच्या शिक्षणासाठी तत्कालिन समाजाशी लढणारे महात्मा जोतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. या सगळ्यांनी फक्त स्वतःच्या मनाचा कौल घेतला... आणि जिद्दीनं इतिहास निर्माण केला. लोक बोलतील... फक्त बोलतील... त्यांच्या मनाचा विचार करून आपल्या आयुष्यातील आनंदाच्या संधी कधीच दवडायच्या नाहीत. अखेरीस इतकंच सांगतो की, आपल्या आयुष्यात असा प्रसंग आला तर भारा तांबेंची ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ही कविता आठवायची आणि त्याचबरोबर हिंदीतल्या गाण्याचे शब्ददेखील आठवायचे.
कुछ तो लोग कहेंगे... लोगोंकाकाम है कहेना...







