नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
ज्याने आयुष्यात एकदा तरी ‘गाण्याच्या भेंड्या’ हा खेळ खेळला आहे त्या प्रत्येकाला ‘छलीया’मधील एक गाणे नक्कीच माहीत असते–
‘डम डम डिगा डिगा, मौसम भीगा भीगा,
बिन पिये मै तो गिरा, मैं तो गिरा,
हाय अल्ला, सुरत आपकी सुभानअल्ला!...’
कारण ‘ड’ आल्यावर पहिल्या फेरीत याच गाण्याने आपली सुटका केलेली असते. (अशीच ‘छ’ आल्यावर याच सिनेमातील ‘छलीया मेरा नाम’ने प्रत्येकाला भेंडीपासून वाचवलेले असते.) कदाचित कल्याणजी आनंदजींच्या ठेकेबाज चालीमुळेही असेल पण ही गाणी सर्वांना माहीत असतातच. राजकपूरच्या सुरुवातीच्या काळात चार्ली चॅपलीनची नक्कल करायच्या सवयीमुळे साधाभोळा स्वभाव, गरिबी आणि मनाचा मोठेपणा ही त्याच्या बहुतेक पात्रांची वैशिष्ट्ये असायची. म्हणूनच ‘डम डम डिगा डिगा’मध्ये जां निसार अख्तर यांनी गरिबीचा आणि तदनुषंगिक फिल्मी ‘बड्या दिला’चाही उल्लेख टाकला -
“सनम हम माना, गरीब है,
नसीबा खोटा सही, बंदा छोटा सही,
दिल ये खज़ाना है प्यारका,
हाए अल्ला, सूरत आपकी सुभान अल्ला.”‘छलीया’ हा १९६०ला आलेला मनमोहन देसाईंचा पहिला सिनेमा! राजकपूर आणि नूतनबरोबर प्राण, रहमान आणि शोभना समर्थ होते. फियोदोर दोस्तोव्हस्कीच्या ‘व्हाईट नाईटस’ या लघुकथेवर बेतलेल्या कथानकाला मनमोहनजींनी भारताच्या फाळणीची पार्श्वभूमी दिली.
लाहोरमधील शांतीचे (नूतन) लग्न ऐन फाळणीच्यावेळी केवलशी (रहमान) होते. लग्नानंतर दोन्ही कुटुंबांना लाहोर सोडून दिल्लीला यावे लागते. फाळणीच्या भयानक परिस्थितीत झालेल्या चुकामुकीमुळे शांतीला अब्दुल रहमानच्या (प्राण) घरी राहावे लागते. काही वर्षांनी शांतीला भारतात येणे शक्य होते तेव्हा पती ‘केवल’ मोकळ्या मनाने तिचे स्वागत करतो पण तो मुलाला त्याचे नाव विचारतो तेव्हा मुलगा सांगतो, ‘अन्वर’! केवलला हा पहिला धक्का! वडिलांचे नाव विचारल्यावर तो सांगतो, अब्दुल रहमान! झाले! सगळे वातावरण क्षणात बिघडते.
पतीने घराबाहेर काढलेल्या शांतीला तिचे वडीलही घरात घेत नाहीत. टोकाची निराश झालेली शांती आत्महत्येचा प्रयत्न करते तेव्हा तिथे असलेला राजकपूर (छलीया) तिला वाचवतो. पुढे सहवासाने त्याच्या मनात तिच्याविषयी प्रेम निर्माण होते. मात्र तिची खरी कहाणी समजल्यावर दिलदार छलीया तिच्यात आणि तिच्या दुरावलेल्या पतीत दिलजमाई घडवून आणतो आणि एकटाच तिच्या जीवनातून निघून जातो अशी ही कथा! कल्याणजी-आनंदजींनी समरसून संगीत दिलेली बहुतेक गाणी लोकप्रिय झाली. समीक्षकांच्या मते छलीयाच्या यशात कल्याणजी आनंदजींच्या संगीताचा मोठा वाटा होता.
छलीया चांगला चालला. राजकपूरला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून आणि नूतनला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ म्हणून फिल्मफेयर नामांकनही मिळाले. पण छलीयाच्या यशामुळे मनमोहन देसाईना जणू एक फॉर्म्युलाच सापडला. पुढे त्यांच्या सिनेमातली पात्रे सिनेमाच्या पूर्वार्धात नियमितपणे हरवू लागली आणि उत्तरार्धात सापडू लागली! उदाहरणच द्यायचे झाल्यास रांगेत आहेत ‘अमर अकबर अँथोनी’(१९७७), ‘धरमवीर’(१९७७),‘नसीब’(१९८१),‘कुली’(१९८३),‘रामपूरका लक्ष्मण’(१९७२) इत्यादी इत्यादी.
जिचे प्राण वाचवले त्या नूतनवर राज कपूरचे मनापासून प्रेम बसले आहे. पण त्याची ते व्यक्त करायची हिंमत होत नाही. एकदा तो तिला देवळात भेटतो. तेव्हा भावना अनावर होऊन आपले प्रेम सूचित करतो. ती विवाहित आहे आणि तिला एक मुलगा आहे हे त्याला माहीत नसते. पतीकडे परत जावून आपल्या संसार पुन्हा उभा करायची उत्कट इच्छा असलेली शांती त्याला स्पष्ट नकार देते. त्यावेळी आतून पूर्णपणे तुटलेल्या छलीयाच्या तोंडी जां निसार अख्तरसाहेबांनी एक गाणे दिले होते.
कुणाही अगतिक आणि हरलेल्या प्रेमिकाची भावना व्यक्त करणारे, त्याच्या भाबड्या भावना व्यक्त करणारे अख्तरसाहेबांचे शब्द होते -
‘मेरे टूटे हुए दिलसे,
कोई तो आज ये पूछे.
के तेरा हाल क्या है,
मेरे टूटे हुए दिलसे...’
माणूस प्रेमात हरल्यावर मनातून प्रचंड एकटा बनलेला असतो. त्याला स्वत:हून कुणाशी बोलावेसेही वाटत नसते. पण त्या विमनस्क अवस्थेत कुणी नुसती सहानुभूती दाखवली तरी त्याला केवढा तरी दिलासा मिळतो. पण छलीयाला असे कुणीही जवळचे नाही. कसेबसे कुणीतरी जवळचे वाटू लागले होते तेही नुसते प्रेम व्यक्त केल्याने आता कायमचे दूर जाणार हे पाहून त्याच्या मनाची घालमेल होते.
नियतीला दोष देताना म्हणतो, ‘कधी नव्हे ते माझ्या जीवनाच्या शुष्क वेलीवर प्रेमाचे एक फूल उमलत होते. तू निर्दयपणे ती फांदीच तोडून टाकलीस ना?
‘किस्मत तेरी रीत निराली,
ओ छलिये, ओ छलनेवाली.
फूल खिला तो टूटी डाली...’
तो इतका निर्मळ मनाचा आहे की तो सगळ्या शोकांतिकेचा दोष स्वत:लाच देतो. माझ्या नजरेची चूक झाली, मी तिच्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढला, तिच्या चांगुलपणाला प्रेम समजून बसलो यात तिचा काय दोष? असे तो स्वत:लाच विचारतो -
‘जिसे उल्फत समझ बैठा,
मेरी नज़रोंका धोखा था.
किसीकी क्या खता है,
मेरे टूटे हुए दिलसे...’
अगदी एकटेपणाचे, उजाड, उदास जगणे नशिबी आलेल्या छलीयाच्या जीवनात शांतीच्या परिचयामुळे प्रेमाची शक्यता निर्माण झाली असते पण पहिल्याच प्रयत्नात त्याचे प्रेम नाकारले जाते, विफल होते. विमनस्क अवस्थेत त्याला वाटते, ‘आधी एकटा होतो, ते किती बरे होते! निदान माझा मी स्वतंत्र तरी होतो, आता हे काय होऊन बसले... नाकारले गेलेले एकतर्फी प्रेम ही किती वेदनादायी भावना असते ते मला आता समजते आहे -
‘मांगी मुहब्बत पाई जुदाई,
दुनिया मुझको रास न आई.
पहले क़दमपर ठोकर खाई,
सदा आज़ाद रहते थे.
हमें मालूम ही क्या था,
मुहब्बत क्या बला है.
मेरे टूटे हुए दिलसे...’
जुन्या काळी प्रेमाचे सफल होणे ही सिनेमातच नव्हे तर वास्तव जीवनातही फार दुर्मीळ गोष्ट होती. त्यामुळे शोकांतिकांशी लोक चटकन समरस होत. सिनेमातल्या एकेक प्रसंगाला, एकंदर कथानकाला अधिक उत्कट करणारी गाणी असत. अशी जुन्या गीतकारांनी समरसून लिहिलेली, भावनेने ओतप्रोत भरलेली गाणी, जाणकार संगीतकरांनी त्यांना दिलेले, मनात रेंगाळणारे संगीत, कलाकारांचा निरागस, सकस अभिनय हे सगळे मनाला एका वेगळाच आनंद देऊन जाते. म्हणून हा ‘नॉस्टॅल्जिया’!