नाते

जीवनगंध : पूनम राणे 


अवंती नगरीत ६५ वर्षांची वृद्ध आजी राहत होती. तिला मूल-बाळ कोणीच नव्हते. तिच्या पतीना देवाज्ञा झाली होती. त्यामुळे घरी ती एकटीच राहत होती.शरीरावर सुरकुत्या पडलेल्या होत्या. कापसासारखे पांढरे शुभ्र केस तिला शोभून दिसत होते; परंतु आजी तरतरीत होती, सुदृढ होती. आपली स्वतःची कामे ती स्वतःच करत होती. गावात सुधारणा बऱ्यापैकी झाल्या होत्या. घरोघरी पाण्याचे नळ आले होते; परंतु आजीने मात्र आपल्या घरी पाण्याची पाइपलाइन करून घेतली नव्हती. गावातील माणसे तिला विनवणी करत होती; परंतु आजी ऐकेल तर, शपथ...!”


तिचे आपले एकच म्हणणे ,‘मी जिवंत असेपर्यंत माझे पारंपरिक काम चालू राहील, मी तळ्यावरूनच पाणी घेऊन येईन.’ कित्येक वर्षे असे काम करते म्हणून, मी सुदृढ आहे. मला कोणताही आजार नाही. अशी ती रोखठोक सर्वांना सांगत असायची. आजीकडे पाणी आणण्यासाठी दोन मातीची मडकी होती. कित्येक वर्षे ती मातीची मडकी जपून वापरत होती. त्या दोन्ही मडक्यांवर तिचे विशेष प्रेम होते.


अशीच एके दिवशी आजीने दोन्ही मडकी भरून आणून आजूबाजूला ठेवली. मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास एक मडके दुसऱ्या मडक्याशी बोलू लागले. अगं, “तुला काही कळतंय का?” तुझ्यातून पाणी पाझरत चाललंय. आजी बिचारी पाणी आणून ठेवते. कष्ट घेते आणि तुझा आजीला काहीच उपयोग होत नाही. सकाळपर्यंत तुझ्यातील पाणी संपून जाते.” पहिल्या मडक्याचे बोलणे ऐकून दुसऱ्या मडक्याला अत्यंत वाईट वाटले. दुसऱ्या मडक्याने आपली खंत आजीला बोलून दाखवली. आजी म्हणाली, “वाईट वाटून घेऊ नकोस, थोडे दिवस थांब.” असे म्हणून आजी आजही त्या दोन्ही मडक्यांना घेऊन तळ्यावर गेली. दोन्ही मडकी भरून आपल्या घरी आणून ठेवली. पुन्हा तेच झाले. पहिले मडके दुसऱ्या मडक्याला हिणवू लागले. त्याचे बोलणे दुसऱ्या मडक्याच्या जिव्हारी लागले. सकाळी मडक्याने सारी हकीगत आजीला सांगितली आणि म्हणाले, “मला दुरुस्त करून घ्या!”


आजी म्हणाली, महिनाभर थांब. महिनाभर पहिल्या मडक्याचे टोमणे, दुसरे मडके सहन करत होते. ते बोलणे दुसऱ्या मडक्याला सहन होत नव्हते. मनातल्या मनात ते कुडत होते. सकाळी आजी आली. दोन्ही मडकी उचलली आणि तळ्याकाठी आली. दोन्ही मडकी भरून घेतली आणि पहिले मडके डाव्या कमरेवर व दुसरे मडके उजव्या हातात घेऊन ती निघाली. रस्त्यातून येताना दुसऱ्या मडक्याला म्हणाली ,“मला सांग, मी तुला ज्या हातात घेतलं त्या बाजूला काय दिसलं.” काय पाहिलंस आणि डाव्या बाजूला काय पाहिलंस. मडके म्हणाले, “उजव्या बाजूला गवत उगवलेले पाहिले आणि डाव्या बाजूला मात्र काहीच नव्हते.”
आजी म्हणाली, “तुझ्यातून पाणी पाझरते आहे, हे मला कित्येक दिवस माहीत होते; परंतु मला तुला फेकून द्यायची हिम्मत होत नव्हती. मी विचार केला तुझ्यातून पाझरणाऱ्या पाण्याचा उपयोग करावा. म्हणून मी उजव्या बाजूला बिया पेरल्या आणि तुझ्यातून पाझरणारं पाणी रोज त्या बियांना मिळाल्यामुळे त्या बियातून रोपे तयार झाली” आजीचे बोलणे ऐकून दुसऱ्या मडक्याला अत्यंत आनंद झाला. आपले सारे दुःख विसरून ते पहिल्या मडक्याकडे पाहू लागले. आजीच्या ते लक्षात आले.


आजी दोन्ही मडक्यांना म्हणाली, “कित्येक वर्षे आपलं तिघांचं एक नातं जमलं होतं. त्यामुळे सहजासहजी एका मडक्याचा उपयोग होत नाही म्हणून ते बाजूला ठेवणे मला योग्य वाटलं नाही. मी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातून पाणी पाझरतच होते. ते टाकाऊ म्हणून बाजूला ठेवलं असतं तर, खूप वाईट वाटलं असतं. शेवटी मला ही युक्ती सुचली. आज अनेक माणसं या पायवाटांवरून जाताना हिरवं गार गवत डोळ्यांत साठवून ठेवतात. पहाटे पहाटे त्यावरून हलकेच अनवाणी चालतात. गवताचा नाजूक मुलायम स्पर्श त्यांच्या तळपायाला सुखद आनंद देत असतो. आजीचे बोलणे ऐकून पहिल्या मडक्याला अत्यंत वाईट वाटले. त्यांनं आजीची क्षमा मागितली आणि दुसऱ्या मडक्याला घट्ट मिठी मारली.


तात्पर्य : वस्तू सजीव असो वा निर्जीव तिचं आणि आपलं एक नातं निर्माण झालेलं असतं. ते जपण्यातच आनंद असतो.

Comments
Add Comment

सौभरी ऋषींची कथा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे श्रीमद्भागवत पुराण व विष्णुपुराणानुसार एकदा मनूला शिंका आली, त्यातून एक

आठवणीतला शिमगा

स्मृतिगंध; लता गुठे मी वयाच्या १७ व्या वर्षी मुंबईत आले आणि या सिमेंटच्या जंगलात माझी कर्मभूमी निर्माण केली. पण

बागों मे जबजब फूल खिलेंगे...

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे कर्णमधुर संगीत, आपल्या कलेशी समरस झालेले गायक, अर्थपूर्ण हृदयस्पर्शी गाणी,

कोवळ्या मनांच्या संवेदना ...

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य घटनांची अनेक स्पंदनं मनात उमटत असतात. एखादं दृश्य

Women Day 2026 : कळी उमलू लागलीये...

मनोगत; साक्षी माने ‘स्त्री’ हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर उभी राहते ती, तिची अष्टपैलू रूपं आणि तिच्या

Women Day 2026 : सामंजस्य हरवतेय!

निरीक्षण; डॉ. गौरी कानिटकर महात्मा फुले, आगरकर प्रभुतींनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. मुलगी शिकली की घर