Saturday, February 14, 2026

...अन्यथा, मी विवाहच करणार नाही !

...अन्यथा, मी विवाहच करणार नाही !

स्मृतीपटल : अनिल तोरणे

या जीवनात कोणाला कधी कोण आवडेल हे सांगता येणार नाही. एखादी व्यक्ती जर मनात भरली तर तिच्याशिवाय संपूर्ण जीवन तर सोडाच एक क्षणही राहू शकत नाही अशी काहींची अवस्था होते. बऱ्याच वर्षांपूर्वी एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना त्या चित्रपटाच्या नायकाची नजर त्याची नायिका म्हणून भूमिका करीत असलेल्या अभिनेत्रीवर पडली. दोघेही एकमेकांना आवडू लागले आणि नायक वेळोवेळी तिला लग्नाची मागणी घालू लागला. असेच पुन्हा एकदा नायकाने त्या अभिनेत्रीला लग्नाविषयी विचारले असता ती त्याला स्पष्ट शब्दांत म्हणाली, लग्न करायचे असेक तर आजच; अन्यथा मी विवाहच करणार नाही !

ही त्या काळातील घटना आहे ज्या काळात अभिनेत्री गीता बाली आघाडीच्या अभिनेत्री बनल्या होत्या आणि अभिनेते शम्मी कपूर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील होते. अशातच शमी कपूर यांना गीता बाली यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तो चित्रपट होता निर्माते-दिग्दर्शक किदार शर्मा यांचा ‘रंगीन रातें’! या चित्रपटाच्या बाह्यचित्रीकरणासाठी गीता बाली आणि शम्मी कपूर या दोघांना महिनाभर रानीखेत या गावात जावे लागले. चित्रीकरणाला आरंभ झाल्यावर सेटवर काम करताना दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ निर्माण झाली. हृदयात धडधड वाढत असताना प्रेमही वाढू लागले. एक महिन्याचे चित्रीकरण संपत आले असतानाच गीता बाली यांच्या प्रेमात शमी कपूर पुरते गुरफटून गेले होते. शम्मी कपूर यांना वाटत होते की, कसा का होईना पण गीता बाली यांच्याशी आपला विवाह झाला पाहिजे आणि त्या आपल्या सहचारिणी बनल्या पाहिजेत!

म्हणतात ना की जोड्या वरूनच जुळून येतात आणि या धरणीवर लोक त्यांना मूर्त स्वरूप देतात. शम्मी कपूर यांनी आपले गीता बाली यांच्यावरील प्रेम त्यांच्यापुढे उघड केले आणि त्यांना लग्नाबद्दल विचारले. गीता बाली यांनीही त्यांच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगितले पण त्यांच्याशी लग्न करण्यास चक्क नकार दिला! नकाराचे कारण म्हणजे शम्मी कपूर यांच्यापेक्षा गीता बाली एक वर्षाने मोठ्या होत्या. तसेच शम्मी कपूर यांचे थोरले बंधू राज कपूर यांच्या नायिकेची भूमिका त्यांनी केली होती आणि शम्मी कपूर यांचे पिता पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केलेल्या होत्या. गीता बाली यांना भीती वाटत होती, की त्यांच्या व शम्मी कपूर यांच्या प्रेमाविषयी जर दोघांच्या कुटुंबीयांना कळले तर त्यांची काय प्रतिक्रिया असेल? ते याला संमती देतील की नाही? गीता बाली यांच्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता तरीही शम्मी कपूर आपल्या म्हणण्यावर ठाम होते. ते जेव्हा जेव्हा गीता बाली यांना भेटत असत तेव्हा तेव्हा आपले प्रेम त्यांच्याकडे उघड करीत आणि लग्नाचाही विषय काढीत असत. त्यांच्या भेटी होतच राहिल्या आणि यात चार महिने निघून गेले.

चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर २३ ऑगस्ट, १९५५ या दिवशी पृथ्वीराज कपूर आणि त्यांच्या सौभाग्यवती भोपाळला गेले होते. नेहमीप्रमाणे त्या दिवशीही सायंकाळी शम्मी कपूर यांना भेटावयास गीता बाली आल्या आणि शम्मी कपूर यांनी पुन्हा त्यांच्यापुढे लग्नाचा विषय काढला. त्या दिवशी गीता बाली यांच्या मनात काय होते कोणास ठाऊक पण शम्मी कपूर यांच्या तोंडून लग्नाचा विषय निघताच त्यांनी त्वरित लग्नाला होकार दिला ! होकार मिळताच शमी कपूर यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही; परंतु त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही ! कारण होकार देताना गीता बाली यांनी त्यांना एक अट घातली होती. त्या शम्मी कपूर यांना म्हणाल्या, मी विवाह करेन तर केवळ आजच; अन्यथा मी विवाहच करणार नाही ! ती अट ऐकताच शम्मी कपूर यांच्या चेहऱ्यावरील आनंद पार मावळला! त्यांच्या मनात विचार आला की असली कसली अट? परंतु थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांनी गीता बाली यांची अट मान्य केली आणि त्या दोघांचे सामायिक परिचित असलेले हास्य अभिनेते जॉनी वॉकर यांचा सल्ला घेण्यासाठी दोघे त्यांच्याकडे गेले. गंमतीचा भाग असा की, जॉनी वॉकर यांनीही एका सप्ताहापूर्वी पळून जाऊन लग्न केले होते.

दोघे जॉनी वॉकर यांना भेटल्यावर ते या दोघांना म्हणाले, की मी मुस्लीम असल्याने निकाह करण्यासाठी मी मशिदीत गेलो होतो; पण तुम्ही दोघे हिंदू आहात म्हणून तुम्हाला मंदिरातच गेले पाहिजे. जॉनी वॉकर यांनी असे सुचविल्यावर गीता बाली आणि शम्मी कपूर त्यांचे स्नेही निर्माते हरी वालिया यांना बरोबर घेऊन दक्षिण मुंबईच्या मलबार हिल भागातील बाणगंगा मंदिरात पोहोचले; परंतु तोवर मंदिराचा दरवाजा बंद झालेला होता. मंदिराच्या पुजाऱ्याने त्यांना दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता मंदिरात येण्यास सांगितले. त्यानंतर दोघे शम्मी कपूर यांच्या माटुंग्यातील निवासस्थानी आले आणि पहाट कधी होते याची प्रतीक्षा करीत बसले. पहाट झाली. हरी वालिया यांच्यासमवेत दोघे ४ वाजता मंदिरात पोहोचले आणि आपल्या जवळच्या नातेवाइकांशिवायच त्यांनी अग्नीला साक्षी ठेवून सप्तपदी केली. जेव्हा पुरोहिताने उत्तर भारतातील चालीरीतीप्रमाणे शम्मी कपूर यांना गीता बाली यांच्या भांगात कुंकू भरण्यास सांगितले तेव्हा दोघे अवाक् होऊन एकमेकांकडे पाहातच राहिले, कारण घाई गडबडीत शमी कपूर कुंकू आणावयासच विसरले होते! आता काय करायचे? तेवढ्यात गीता बाली यांनी आपल्या पर्समधून लाल रंगाची ओष्ठशलाका (लिपस्टिक) काढली आणि शम्मी कपूर यांच्याकडे दिली. त्या ओष्ठशलाकेने भांगात लाल रंग भरल्यावर शम्मी कपूर आणि गीता बाली जन्मभरासाठी एकमेकांचे होऊन गेले !

Comments
Add Comment