Sunday, February 15, 2026

Mahashivratri 2026: मध्यरात्रीपासून शिवालय गजबजली; भाविकांची अलोट गर्दी

Mahashivratri 2026: मध्यरात्रीपासून शिवालय गजबजली; भाविकांची अलोट गर्दी

आज (रविवार, १५ फेब्रुवारी) देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. या दिवशी भगवान शिवाची उपासना केली जाते. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला हा उत्सव साजरा केला जातो. पुराणांनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. या दिवशी भक्त रात्रभर ‘ॐ नमः शिवाय’ चा मंत्रजप आणि भजन-कीर्तन करतात. भाविक उपवास ठेवून शिवलिंगावर बेलपत्र, दूध, मध, धतूरा अर्पण केले जाते. शिवलिंगावर ‘पंचामृत अभिषेक’ केला जातो. महाशिवरात्रीला १२ ज्योतिर्लिंगाला भक्तांची मोठी गर्दी असते. महाशिवरात्री ही ध्यान आणि साधनेसाठी अत्यंत शक्तिशाली रात्र मानली जाते. या दिवशी केलेली प्रार्थना आणि जप विशेष फलदायी ठरतो.

या पवित्र दिवशी राज्यातील वेगवेगळ्या शिव मंदिरात भक्तांनी रात्रीपासून गर्दी केली आहे.

कंकालेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी:

बीडमध्ये महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून शिवालय दर्शनासाठी गजबजली आहे. बीड मधील कंकालेश्वर या प्राचीन हेमाडपंती मंदिरात मध्यरात्रीपासून दर्शन आणि अभिषेक सुरू आहे. तर पहाटे भाविकांच्या उपस्थितीत महापूजा पार पडली. कंकालेश्वर मंदिर साधारणपणे १२ व्या शतकात चालुक्य किंवा यादव काळातील असावे असा अंदाज वर्तवला जातो.

भगवान शंकरांनी 'कंकासुर' नावाच्या राक्षसाचा वध येथे केला होता. अशी पौराणिक कथा आहे. तर हे मंदिर एका मोठ्या सरोवराच्या मध्यभागी बांधलेले आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक अरुंद पूल आहे. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात असून त्यावर अत्यंत कोरीव काम केलेले आहे. हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. कंकालेश्वर बीड शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. यावर्षी मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.

श्री राजेश्वर महाराज मंदिर:

अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजेश्वर महाराज मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आकर्षक विद्युत रोषणाई आणि घोषणांनी संपूर्ण राजराजेश्वर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.

रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. ऐतिहासिक आणि पुरातन अशी ओळख असलेले हे मंदिर अकोल्यातील श्रद्धेचे केंद्र मानले जाते. विशेष पूजा-अर्चा, अभिषेक आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भक्तांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भगवान शंकराचे दर्शन घेत महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जात आहे.

ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात मध्यरात्रीपासून गर्दी:

हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे देशातील आठव्या स्थानी असलेले ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर आहे. आज महाशिवरात्रीच्या पर्वावर या मंदिरात भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते मध्यरात्रीनंतर दुग्धाभिषेक व महापूजा करण्यात आली.

या महापूजेनंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातून महाशिवरात्रीच्या या पर्वावर मोठ्या संख्येने भाविक औंढा नागनाथ नगरीत दाखल झाले आहेत. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. हर हर महादेव व बम बम बोले चा गजर करत भाविक भक्तीमय वातावरणात दर्शन घेत आहेत. मंदिराचा परिसर देखील आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा