मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व हल्ल्यांतून तावून सुलाखून सोमनाथ मंदिर आजही उभे आहे. वारंवार जीर्णोद्धार झाला पण सोमनाथावरील भाविकांची श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही. सोमनाथावरील पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. याप्रसंगी पंतप्रधानांनी उपस्थितांना हिंदू धर्माचे महात्म्य आणि सोमनाथचा इतिहास याविषयी सोप्या भाषेत सविस्तर सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आता बॉलिवूड एकटवटले आहे. सोमनाथ मंदिराचा इतिहास लवकरच हिंदी चित्रपटाच्या रुपाने मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. नियोजनानुसार हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
जय सोमनाथ या हिंदी चित्रपटासाठी लार्जन चॅन लाईफ चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय असलेल्या संजय लील भन्साळीनं माहितीपर क्षेत्रातील (डॉक्युमेंटरी) दिग्गज केतन मेहतांसोबत युती केली आहे. भारतीय सिनेसृष्टीतील दोन प्रभावशाली आणि सर्जनशील दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता हे दोघे संयुक्तपणे 'य सोमनाथ'वर काम करणार आहेत.
‘जय सोमनाथ’ची कथा प्रेक्षकांना इ.स. १०२५ - १०२६ या कालखंडात घेऊन जाणार आहे. त्या वेळी गझनीच्या महमूदने गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर आक्रमण करून त्याची लूट केली होती. भारतीय इतिहासातील हा प्रसंग विनाशानंतर पुन्हा उभे राहण्याच्या जिद्दीचे प्रतीक मानला जातो. विशेष म्हणजे या घटनेला यंदा एक हजार वर्षे पूर्ण होत आहेत. अशा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट प्रथमच मोठ्या पडद्यावर साकारला जात आहे.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे भन्साळी आणि मेहता यांची सर्जनशील भागीदारी. भव्य सेट्स, नेत्रदीपक दृश्यरचना आणि भावनिक कथनशैलीसाठी ओळखले जाणारे भन्साळी, तर ऐतिहासिक दृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले केतन मेहता – या दोघांची सांगड ‘जय सोमनाथ’मध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही दिग्दर्शकांचा गुजरातशी असलेला संबंध लक्षात घेता, या कथेत वास्तव आणि भावनांचा प्रभावी संगम दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘जय सोमनाथ’ची निर्मिती भन्साळी प्रोडक्शन्स आणि केतन मेहता यांच्या माया मूव्हीज या बॅनरखाली होत आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी केतन मेहता स्वतः सांभाळणार आहेत. हा भव्य ऐतिहासिक चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.