Sunday, February 15, 2026

Indian Student in America: कॅलिफोर्नियामध्ये बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सहा दिवसांनी सापडला

Indian Student in America: कॅलिफोर्नियामध्ये बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सहा दिवसांनी सापडला

बंगळुरू: अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. कर्नाटकातील साकेत श्रीनिवासैया हा ९ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. भारतीय वाणिज्य दूतावास सॅन फ्रान्सिस्को यांनी पुष्टी केली की पोलिसांनी साकेतचा मृतदेह शोधून काढला आहे. साकेत अमेरिकेत राहून पदव्युत्तर शिक्षण घेत होता आणि तो कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले चा विद्यार्थी होता.

दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले की विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पार्थिव देह लवकरात लवकर भारत येथे पाठवण्यासाठी सर्व आवश्यक मदत दिली जाईल.आपल्या पोस्टमध्ये दूतावासाने लिहिले, “हरवलेल्या भारतीय विद्यार्थी साकेत श्रीनिवासैया यांचा मृतदेह सापडल्याची माहिती देताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे आणि पार्थिव देह लवकर भारतात पाठवण्याची व्यवस्था करणे यासह सर्व आवश्यक मदत देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आमचे अधिकारी कुटुंबाशी थेट संपर्कात असून सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात त्यांना मदत करतील.”

साकेत बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली होती. कॅम्पसपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर त्याला शेवटचे पाहण्यात आले होते. त्यानंतर अंजा लेक आणि बर्कले हिल्स परिसरात शोधमोहीम चालवण्यात आली. नंतर कॅम्पसजवळील टिल्डेन रीजनल पार्क जवळ एका निवासस्थानाजवळ त्याचा पासपोर्ट व लॅपटॉप असलेली बॅग सापडली. माध्यमांच्या वृत्तानुसार त्यांचा मृतदेह अंजा लेकमध्ये आढळला. साकेत श्रीनिवासैया हा उत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत मास्टर ऑफ सायन्सचे शिक्षण घेत होता आणि तो तुमकुरु येथील रहिवासी होता. त्याला शेवटचे अंजा लेक परिसरातच पाहण्यात आले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >