वर्ष कसे होते?

कथा :प्रा. देवबा पाटील 


शाळा सुटली आणि सीता व नीता लगबगीने घरी आल्या. आज त्यांची मावशी त्यांना आपले वर्ष कसे होते हे सांगणार होती.‘वर्ष कसे मोजतात मावशी?’ नंतर सीताने प्रश्न केला.

‘आणि मावशी ते लीप वर्ष काय असते गं?’ नीताने सीताच्या प्रश्नात आणखी भर टाकली.


पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. वास्तविकत: पृथ्वी ३६५ दिवसांऐवजी तंतोतंत ३६५.२५ दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणून ३६५ दिवसांच्या कालावधीला एक वर्ष म्हणतात. ख्रिश्चन कालगणनेनुसार वर्षाचे ३६५ दिवस करण्यासाठी इंग्रजी ७ महिने ३१ दिवसांचे, ४ महिने ३० दिवसांचे व फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा ठरवला आहे; परंतु दरवर्षी ०.२५ दिवस म्हणजेच त्या वर्षातील ६ तास शिल्लक राहतात. हा दरवर्षीचा जास्तीचा पाव दिवस भरून काढण्यासाठी दर वर्षीचे ६ तास याप्रमाणे दर ४ वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जास्तीचा धरतात म्हणजे दर ४ वर्षांनी फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांऐवजी २९ दिवसांचा असतो. म्हणजे त्या वर्षात ३६६ दिवस होतात. म्हणून दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा असतो. अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात आणि विशेष म्हणजे ज्या इसवी सन वर्षाला ४ ने पूर्ण भाग जातो ते लीपवर्ष ठरविण्यात आले आहे आणि त्याच वर्षात फेब्रुवारी महिन्याचे २९ दिवस येत असतात. उदा. आता २०२४ हे लीपवर्ष होऊन गेले. आता पुढील लीपवर्ष हे २०२८ असेल. मावशीने सविस्तर माहिती सांगितली.


‘हो का गं मावशी.’ दोघीही उत्तरल्या. ‘हो.’ मावशी म्हणाली, ‘पुढे ऐका, फिरताना पृथ्वीचा आस किंचितसा कलता म्हणजे झुकता असतो. अशारीतीने स्वत:भोवती व सूर्याभोवती फिरताना पृथ्वीचा काही भाग थोडा थोडा सूर्याकडे येतो व त्यावर सूर्याचा प्रकाश पडतो त्यालाच त्या भागातील ‘दिवस’ उजाडला असे म्हणतात. त्याचवेळी त्या भागाच्या विरुद्ध सूर्याकडे नसलेला पृथ्वीचा मागील भाग हा सूर्यापासून हळूहळू थोडा थोडा दूर जात असल्याने त्यावरील प्रकाश हळूहळू कमी कमी होत जातो व तेथे हळूहळू अंधार पडू लागतो. त्या विरुद्ध भागावर सूर्याचा प्रकाश मुळीच न पडल्याने त्या भागात पूर्णपणे अंधार होतो. त्यालाच त्या भागात ‘रात्र’ झाली असे म्हणतात.’


मावशी पुढे सांगू लागली, “पृथ्वीच्या या भ्रमंतीमुळे उजेडाच्या भागात सकाळी आपणास हळूहळू सूर्य उगवताना दिसतो, भर दुपारी पृथ्वी सूर्याच्या बरोबर समोर आल्याने सूर्य डोक्यावर दिसतो आणि संध्याकाळी उजेडाचा भाग सूर्यापासून जसजसा मागे मागे, दूर दूर जातो तसतसा आपणास सूर्य मावळताना दिसतो. हळूहळू उजेड कमी कमी होऊन संधिप्रकाश पडतो व त्यानंतर काळोख पसरायला लागतो. उजेड्या भागात ज्यावेळी काळोख पडायला लागतो त्यावेळी आधीचा मागील अंधा­रा भाग हळूहळू थोडा थोडा, पुढे पुढे सूर्याकडे यायला लागतो व त्या अंधा­ऱ्या भागावर हळूहळू सूर्याचा थोडा थोडा प्रकाश पडायला लागतो, म्हणजेच उजाडायला लागते नि तेथे सूर्य उगवताना दिसतो.”


“मग सूर्योदय व सूर्यास्त कसा होतो?” नीताने विचारले “सूर्योदय म्हणजेच सूर्याचे उगवणे आणि सूर्यास्त म्हणजे मावळणे. रात्रीनंतर सकाळी पृथ्वीचा जो भाग हळूहळू सूर्यप्रकाशात येऊ लागतो तेव्हा तेथे सूर्य हळूहळू क्षितिजाखालून वर येताना दिसतो त्यालाच सूर्योदय म्हणतात, तर दिवसानंतर सायंकाळी ज्या भागात सूर्य हळूहळू क्षितिजाखाली जाऊ लागतो तेव्हा त्याला सूर्यास्त होतो आहे असे म्हणतात. असा एका सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवस असतो, तर सूर्यास्तापासून दुस­ऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत रात्र असते.” मावशीने सांगितले. इतक्यात त्यांना आईने आवाज दिला व त्यांची चर्चा थांबली.
Comments
Add Comment

बाग आणि बायका

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ सोसायटीच्या कोपऱ्यावर एक छोटीशी बाग आणि खूप सारी बाके होती. वृद्धांसाठी केलेली

हृदय परिवर्तन

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर हृदय परिवर्तन म्हणजे केवळ मत बदलणे नव्हे, तर विचार, भावना आणि वर्तन यांमधील

सहल

कथा : रमेश तांबे सरांनी वर्गात सूचना वाचून दाखवली. पुढील महिन्यात वेरूळची लेणी बघण्यासाठी शाळेची शैक्षणिक सहल

घड्याळ अचूक वेळ कशी दाखवते?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता या दोन जुळ्या बहिणी खूपच अभ्यासू व जिज्ञासू होत्या. योगायोगाने सुट्टीनिमित्त

व्हिलन

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ अचानक एखादी बातमी वाचायला मिळते. ती बातमी अख्खा दिवस तुमच्या डोक्यात घोळत राहते.

पेरावे तसे उगवते

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर पेरावे तसे उगवते” ही एक जुनी, पण तितकीच सत्य आणि प्रभावी मराठी म्हण आहे. या