मोठी त्याची सावली

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर


“मोठी त्याची सावली” म्हणजे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, कार्य, विचार किंवा कर्तृत्व इतके प्रभावी असते की त्याचा परिणाम इतरांवर दीर्घकाळ जाणवतो. सावली ही नेहमी आपल्यासोबत असते - त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचे संस्कार, शिकवण किंवा कार्य समाजावर कायम प्रभाव टाकत राहते. मोठी सावली हे एखाद्या महान व्यक्तीच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे. जसा एखादा विशाल वृक्ष आपल्या सावलीत अनेकांना आसरा देतो, तशीच महान माणसे आपल्या विचारांनी, कार्याने आणि संस्कारांनी समाजाला आधार देतात. त्यांच्या कर्तृत्वाची सावली पुढील पिढ्यांवरही कायम राहते. ज्या व्यक्तीचे विचार, आचरण आणि कार्य मोठे असते, त्याची सावलीही मोठी असते. येथे सावली हा शब्द प्रतीकात्मक अर्थाने वापरलेला आहे. हे लक्षात घ्या. व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा, संस्कारांचा आणि कर्तृत्वाचा समाजावर पडणारा प्रभाव म्हणजे त्याची “मोठी सावली” होय.


आपल्या जीवनात आई-वडील, गुरुजन, समाजसेवक, राष्ट्रपुरुष यांची सावली आपल्यावर असते. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा परिणाम आपल्या वर्तनात दिसून येतो. उदाहरणार्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाच्या आणि समतेच्या विचारांची सावली आजही समाजाला मार्गदर्शन करते. त्यांच्या कार्याची उंची मोठी असल्यामुळे त्यांची सावलीही विशाल आहे. मोठी सावली असण्यासाठी व्यक्तीचे चारित्र्य स्वच्छ, विचार उच्च आणि कृती निःस्वार्थी असावी लागते. फक्त पद, पैसा किंवा प्रसिद्धी यामुळे सावली मोठी होत नाही; तर समाजहितासाठी केलेले कार्य, प्रामाणिकपणा आणि सातत्य यामुळे व्यक्तिमत्त्व उजळते. ज्या झाडाची वाढ भक्कम आणि उंच असते, त्याची सावली अधिक पसरते. त्याचप्रमाणे ज्या माणसाचे व्यक्तिमत्त्व उंच आणि व्यापक असते, त्याचा प्रभावही दूरवर पोहोचतो.


आजच्या काळात आपण चांगल्या व्यक्तींच्या सावलीत राहून योग्य संस्कार आत्मसात करणे गरजेचे आहे. चांगले विचार, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे प्रत्येक जण स्वतःची सावली मोठी करू शकतो. समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती ठेवली, तर आपले जीवन अर्थपूर्ण ठरते. “मोठी त्याची सावली” म्हणजे मोठ्या मनाचा, उच्च विचारांचा आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीचा व्यापक प्रभाव होय. आपणही आपल्या कर्तृत्वाने आणि सद्गुणांनी अशी मोठी सावली निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


एक लहान मुलगा शिक्षणासाठी आपल्या मावशीच्या घरी राहायला आला. तो शाळेत जाऊ लागला. मित्रांबरोबर हिंडू-फिरू लागला. पण म्हणतात ना एखाद्याच्या संगतीने एकमेकांत, एकमेकांचे गुणदोष उतरतात. थोडक्यात, ‘ढवळ्याशेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला.’ या छोट्या मुलांमध्ये मित्रांचे गुणदोष दिसू लागले. काही चांगले तर काही वाईट. तो एके दिवशी आपल्या मित्रांबरोबर आमराईत आंबे पाडण्यासाठी गेला. मित्रांनी त्याला आग्रह करून आंब्याच्या झाडावर चढवले. तो आंबे पाडू लागला. इतर जण ते गोळा करू लागले. इतक्यात त्यांना रखवालदार येत असल्याची चाहूल लागली. आंबे वेचणारी सर्व मुले पळून गेली. मात्र झाडावर चढलेला त्या मुलाला पटकन उतरता आले नाही. तो रखवालदाराच्या हाती सापडला. रखवालदाराने त्याचा हात पकडून त्याच्या गालात एक चपराक ठेवून दिली आणि परत मारण्यासाठी हात उगारला. तेव्हा तो मुलगा कळवळून रखवालदाराला म्हणाला, “काका, काका मला मारू नका हो, मला वडील नाहीत.” मी तुमच्या पाया पडतो. रखवालदार त्याला म्हणाला, “वडील नाहीत ना. मग असं वागू नकोस.”


या एका प्रसंगाने त्या मुलाच्या मनाचे परिवर्तन झाले. तो खूप शिकला. खूप मोठा झाला. इतकेच नव्हे तर हाच मुलगा भारताचा पंतप्रधान झाला. त्या मुलाचे नाव होते, लालबहादूर शास्त्री. ज्यांनी आपल्याला ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा दिली. म्हणतात ना ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान.’


तात्पर्य : चांगल्या सवयी आपल्याला योग्य दिशेने नेतात.
विचार : सत्कृत्यांची वर्णने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात.

Comments
Add Comment

डबक्यातला बेडूक

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ माझ्या माहितीप्रमाणे आपण सर्वांनीच कधीतरी आपल्या घरात किंवा शाळेत एक कथा ऐकलेली

कलेचे मूल्य

कथा : रमेश तांबे हजार बाराशे वस्तीचं एक गाव होतं. गाव तसं सधन होतं. त्यांना त्यांच्या गावातल्या एका पुढाऱ्याचा

वर्ष कसे होते?

कथा :प्रा. देवबा पाटील  शाळा सुटली आणि सीता व नीता लगबगीने घरी आल्या. आज त्यांची मावशी त्यांना आपले वर्ष कसे होते

प्रतिज्ञा

गोष्ट लहान, अर्थ महान : शिल्पा अष्टमकर मानवाच्या जीवनात प्रतिज्ञेला फार मोठे महत्त्व आहे. प्रतिज्ञा म्हणजे

संस्काराची शिदोरी

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ ‘संस्कार’ म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार, अशी कुठेतरी व्याख्या

शेजारधर्म

कथा : रमेश तांबे एक होता कावळा. तो एका झाडावर राहायचा. इकडे तिकडे फिरून खाणे मिळवायचा. त्या झाडावर एक चिमणीदेखील