प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
माझ्या माहितीप्रमाणे आपण सर्वांनीच कधीतरी आपल्या घरात किंवा शाळेत एक कथा ऐकलेली असते. कोणती? हा प्रश्न विचारून त्रास करून घेऊ नका. मीच तुम्हाला सांगते आणि तुम्हाला निश्चितपणे ती कुठे ऐकलेली आहे तेही कदाचित आठवेल!
एक बेडकाचे पिल्लू डबक्याबाहेर खेळत होते. खेळता खेळता त्याच्या लक्षातच आले नाही की ते उड्या मारत डबक्यापासून खूप दूर गेलेले आहे. तिथे त्या बेडकाला एक मोठी आकृती दिसते. हो... म्हणजे तो एक प्राणी असतो. खरे तर त्या प्राण्याचे नाव म्हैस असते, पण बेडकाच्या पिल्लाने कधीच म्हैस पाहिलेली नसते त्यामुळे बेडकाचे पिल्लू त्या प्राण्याला पाहून घाबरते आणि बेडूक उड्या मारत आपल्या डबक्याकडे परतते. डबक्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या जीवात जीव नसतो. त्याची आई डबक्याबाहेर येऊन दूरदृष्टी ठेवून आपल्या पिल्लाची वाट पाहत असते. पिल्लू दिसताच ती पळतच सॉरी बेडूक उड्या मारत त्याच्यापर्यंत पोहोचते. पिल्लू धापा टाकत असते. आईला पाहिल्यावर पिल्लाला खूप आनंद होतो. आईला काय सांगू आणि काय नको असे त्या जीवाला होऊन जाते. आई ओरडत असते. कुठे गेला होतास? मी किती वाट पाहत होते... वगैरे वगैरे. पिल्लू आईला सांगतो, “मी एका वेगळ्या जगात गेलो होतो.” वेगळं जग म्हणजे काय हे आईला कळत नाही. ती विचारते, “म्हणजे कुठे रे? मला समजेल असं काहीतरी सांग.” मग पिल्लू म्हणतो, “मी आज एक प्राणी पाहिला. तो खूप मोठा होता. आई म्हणते, “थांब... मी तुला दाखवते. इतका मोठा होता का?” असे म्हणत ती आपलं पोट फुगवते. पिल्लू जोरात ओरडतो, “नाही...याच्याहून खूप मोठा होता.” आई आणखी पोट फुगवते परत तोच प्रश्न विचारते. पिल्लू परत परत, “नाही नाही... खूप म्हणजे खूप मोठा होता.” असे म्हणत राहतो आणि आई पोट फुगवत राहते आणि शेवटी तिचे पोट फुटते आणि ती मरून जाते.
बेडकाच्या पिल्लाची आई कधीच या छोट्याशा डबक्याबाहेर गेलेली नसते त्यामुळे तिने कधीच असा कोणता मोठा प्राणी पाहिलेलाच नसतो... त्यामुळे शेवटी ती किती पोट फुगवणार? आणि किती पोट फुगवले तरी ती म्हशीएवढी थोडीच मोठी होणार? ही गोष्ट त्या बिचाऱ्या आईला कळत नाही आणि तिचा नाहक बळी जातो. आता यातून तुम्हाला कोणता संदेश मिळत आहे? आता मला जे सांगायचं आहे ते लक्षात घ्या. या बेडकाच्या पिल्लाच्या आईसारखे डबक्यात राहणारी असंख्य माणसे आपल्याला आसपास वावरताना दिसतात. आपण त्यांना काही सांगायला गेलो, तर ते त्यांचेच त्रोटक अनुभव आणि त्यांच्या तुटपुंजा विश्वाबद्दल बोलत राहतात. त्यांना त्यांची वैचारिक सीमा भेदून बाहेर जायचे नसते. त्यापेक्षा असेही म्हटले तरी चालेल की, त्यांची सीमा तेवढीच असते. त्याला ते तरी बिचारे काय करणार? कदाचित टीव्ही आल्यावर माणसांच्या थोड्याशा का होईना वैचारिक कक्षा रुंदावल्या. छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या माणसांनासुद्धा श्रीमंत माणसे कशी मोठ्या घरात राहतात... चकाचक गाड्यांमधून फिरतात... मॉडर्न कपडे घालतात... मराठी बोलताना खूप इंग्रजीही बोलतात, हे सगळं माहीत होऊ लागलेले होते, पण आता तर सोशल मीडिया आल्यावर आणि प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल आल्यावर देशविदेशातील माणसांचे जगणे त्यांना छोट्याशा चौकटीत दिसू लागले आहे. एखादे पोटाच्या आतले ऑपरेशन असो किंवा मेंदूचे, साबुदाण्यासारखा पदार्थ बनवण्याची प्रक्रिया असो किंवा रणगाडे बनवायची फॅक्टरी असो हे पाहता जणू काही माणसे मोठ्या प्रमाणात ज्ञानी होऊ लागली आहेत. अगदी सहज ते एकमेकांना सल्ले देतात. कधी कधी प्रवास करताना जेव्हा बिनओळखीची दोन माणसे एकमेकांशी बोलत असतात ते पाहणे आणि त्यांना ऐकणे हा सुद्धा माझ्यासाठी गमतीचा भाग होऊन जातो. म्हणजे एकदा असे झाले की, लोकलच्या माझ्या समोरच्या सीटवर बसलेल्या एका माणसाने दुसऱ्या माणसाला विचारले, “तुम्हाला गरगरतंय का? मग मानेच्या मागे एक फटका मारा.” असे म्हटल्याने तो बिनओळखीचा माणूस स्वतःच्या मानेवर आरामात फटका मारून घेतो. काय म्हणायचे?
आजकाल अशी ज्ञानी माणसे दुसऱ्यांच्या आयुष्याचे सोने करण्याच्या जणू तयारीतच असतात; परंतु त्यांच्या पद्धतीने जेव्हा समोरचा माणूस वागायला लागतो तेव्हा त्याच्या आयुष्याची मातीसुद्धा तितक्याच सहजपणे होते. तेव्हा ज्ञानी माणूस, “मला तरी कुठे याचा अनुभव आहे? मी हे यूट्युबवर पाहिले आणि तुम्हाला सांगितले.” म्हणून मोकळा होतो. असो. तर आपला मुख्य विषय काय आहे, तर डबक्यातील बेडूक. खरोखरी आपण आपले विश्व सोशल मीडियाद्वारे निश्चितपणे विस्तारात आहोत याबद्दल शंकाच नाही; परंतु आपण बसल्या जागेवरून फक्त विश्व न्याहाळतोय. तर थोडीशी हिंमत करू या आणि डबक्याबाहेर पडू या! खऱ्या अर्थाने वैश्विक होऊ या!
pratibha.saraph@ gmail.com







