लंडन: छत्रपती शिवाजी महाराज युवक संघठना तर्फे आज लंडन येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा तसेच महाराष्ट्र भवन, लंडनसाठी जाहीर करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या मदतीचाही उल्लेख करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना उपस्थितांनी विविध आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला लंडन व परिसरातील मराठी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली.
मौनानंतर असोसिएशनचे अध्यक्ष धीरजसिंह तौर यांनी अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, विकासकामांबद्दलची बांधिलकी तसेच समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली.
या कार्यक्रमाच्या आयोजनात धीरजसिंह तौर, सुनिल पाटील, स्वराज मोहिते, आशुतोष धमले, स्वप्नील गावडे, पवन खरात, कौस्तुभ रमेकऱ, यशवंत गुरव, यश सुतार यांसह संघटनेतील सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच मराठी समाजातील अनेक मान्यवर व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांत, भावनिक आणि आदरपूर्ण वातावरणात संपन्न झाला.







