मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत या गाण्याने १ मिलियनहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार करत सोशल मीडियावर ट्रेंड पकडला आहे. या गाण्यात ‘बिग बॉस’मधून ओळख मिळवलेला अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री हेमल इंगळे यांची जोडी झळकत आहे. सई गोडबोले, निहार शेंबेकर आणि शार्क यांच्या आवाजात हे गाणे चित्रित केले गेले आहे.
गीतलेखन विकास साटम यांचे असून दिग्दर्शन तेजस नेरुरकर यांनी केले असून, संगीताची जबाबदारी निहार शेंबेकर, सई गोडबोले आणि शार्क यांनी सांभाळली होती, तर नृत्यदिग्दर्शन पूजा काळे यांनी केले. साईरत्न एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
वेगळ्या धाटणीचा प्रयोग
गायक व संगीतकार निहार शेंबेकर याने या मराठी गाण्यात प्रथमच आफ्रिकन रीदमवरील ‘बायले फंक’ शैलीचा वापर केला आहे. त्यामुळे गाण्याला आंतरराष्ट्रीय धाटणीची झलक मिळाली आहे. अभिनेत्री हेमल इंगळेनेही प्रेक्षकांचे आभार मानत गाण्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर रील्स आणि शॉर्ट व्हिडिओंचा ट्रेंडही पाहायला मिळत आहे. व्ह्यूजमुळे संगीतात काहीतरी नवीन करण्याचा प्रयोग निहार आणि संपूर्ण टीमचा यशस्वी झाल्याचा दिसत आहे.







