शरद पवार राज्यसभेसाठी पुन्हा रिंगणात?

मविआ'चे अस्तित्व लागणार पणाला; सातपैकी सहा जागांवर महायुतीचे वर्चस्व शक्य


मुंबई (सुहास शेलार) : राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आगामी राज्यसभा निवडणूक महाविकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत असून, त्यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे. मात्र, विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता, निवृत्त होणाऱ्या 'मविआ'च्या चार खासदारांपैकी केवळ एकच जागा राखणे विरोधकांना शक्य असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत शरद पवार यांची उमेदवारी आणि मित्रपक्षांची भूमिका यावर 'मविआ'चे भवितव्य अवलंबून असेल.



राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचे गणित पाहता महाविकास आघाडीची मोठी अडचण होणार आहे. विधानसभेत सध्या भाजपाकडे १३२, शिवसेनेकडे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) ४१ असे महायुतीचे भक्कम बलाबल आहे. याउलट, उबाठा गटाकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि शरद पवार गटाकडे केवळ १० आमदार उरले आहेत.



या आकडेवारीनुसार, महायुती सातपैकी किमान सहा जागा सहज जिंकू शकते. उरलेल्या एका जागेसाठी महाविकास आघाडीला आपल्या तिन्ही घटक पक्षांच्या मतांची एकजूट करावी लागेल. काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट एकत्र आले तरच एका उमेदवाराचा विजय निश्चित होऊ शकतो. येत्या २ एप्रिल रोजी निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये शरद पवारांसह त्यांच्या पक्षाच्या फौजिया खान, रजनी पाटील (काँग्रेस) आणि प्रियांका चतुर्वेदी (उबाठा), धैर्यशील पाटील (भाजप), डॉ. भागवत कराड (भाजप) आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे.



यातील प्रियांका चतुर्वेदी आणि रजनी पाटील यांच्यासाठी त्या-त्या पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांच्या पुनर्निवडीवर टांगती तलवार आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी यापूर्वी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते, मात्र आता त्यांनी पुन्हा लढण्याचे संकेत दिल्याने मित्रपक्ष आपल्या जागांचा त्याग करणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.




पवारांच्या नावावर 'मविआ'चे एकमत होणार?


शरद पवार यांच्याकडे ६० वर्षांहून अधिक काळाचा संसदीय अनुभव असल्याने महाविकास आघाडी त्यांनाच आपली एकमेव जागा देण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे काँग्रेस आणि उबाठा या पक्षांना आपल्या वाट्याच्या जागा गमवाव्या लागतील. काँग्रेसला यापूर्वीच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठे झटके बसले आहेत, त्यामुळे ते ही जागा सहजासहजी सोडण्यास तयार होतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. राज्यातील राजकीय चुरस पाहता, महायुती या निवडणुकीत महाविकास आघाडीला 'क्लीन स्वीप' देण्याच्या तयारीत आहे. जर मविआत समन्वयाचा अभाव राहिला, तर शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यालाही विजयासाठी मोठी कसरत करावी लागेल.

Comments
Add Comment

Nashik : नाशिकला समृद्धी महामार्गाची थेट कनेक्टिव्हिटी, पांढुर्ली कनेक्टरला तत्त्वतः मंजुरी

Nashik : नाशिक शहराला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी (Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg) थेट जोडण्यासाठी पांढुर्ली येथे नव्या कनेक्टरची

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि

Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ९५ टक्के; मुंबई आता सुरक्षित कक्षेत

- पाणीकपात रद्दचा निर्णय १ ऑक्टोबर नंतरच मुुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील

Bhuleshwar Cha Raja : भुलेश्वरच्या राजा मूर्ती दुर्घटनेचा तपास सुरू; शिल्पकार अनिकेत देसाईंचा पोलिसांनी नोंदवला जबाब

मुंबई : मुंबईतील भुलेश्वरच्या राजा गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान मूर्ती कोसळून दोन मंडळ पदाधिकाऱ्यांचा

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीला ओळख नोंद न करता लॉजमध्ये रूम, मॅनेजरसह तरुणाला अटक

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीला कोणतीही ओळख नोंद किंवा आवश्यक पडताळणी न करता लॉजमध्ये रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी