Saturday, February 14, 2026

मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून १ ठार, ३ जखमी; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून १ ठार, ३ जखमी; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई : मुंबई मेट्रो लाईन चारच्या पॅरापेटचा काही भाग शनिवारी दुपारी मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री रोडवर कोसळल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले की, घटनास्थळी SOP चे पालन करण्यात आले नसल्यामुळे हा अपघात घडला. दोषी आढळलेल्या कंत्राटदार किंवा अभियंत्यांवर निलंबन व करार रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल.

चालत्या वाहनांवर पॅरापेट कोसळले; १ ठार, ३ जखमी

आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले की, दुपारी सव्वाबारा वाजता LBS मार्गावर मेट्रोचे काम सुरू असताना पॅरापेटचा भाग अचानक कोसळून एका ऑटो-रिक्शा आणि कारवर पडला. या दुर्घटनेत रामदिन यादव हे आपल्या नातेवाईकांसह विवाहासाठी जात असताना जागीच ठार झाले. त्यांच्या दोन नातेवाईकांवर उपासनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांना अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत. मुलुंड येथील दीपा रुहिया या महिलेला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले.

वेल्डिंगऐवजी पॅरापेट कापले; देखरेखीसाठी पर्यवेक्षक नव्हता उपस्थित

आज घडलेल्या घटनेत त्याच कंत्राटदाराचा — मिलान रोड बिल्डटेक LLP — सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्याच्या कामाच्या निष्काळजीपणाबद्दल यापूर्वी पुराव्यासह इशारा दिला होता. मेट्रोच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, कामगारांनी पॅरापेट वेल्डिंग करून सुरक्षित करण्याऐवजी चुकीने ते कापले. SOP नुसार अशा महत्त्वाच्या कामावेळी पर्यवेक्षक उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र घटनास्थळी कोणीही पर्यवेक्षक नव्हता. कमकुवत झाल्यामुळे पॅरापेटचा भाग ११ तासांनी कोसळला, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले.

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाबद्दल यापूर्वीच पुराव्यासह दिला होता इशारा

आमदार मिहिर कोटेचा यांनी पुढे सांगितले की, बीएमसी निवडणुकीची घोषणा होण्याच्या दहा दिवस आधी त्यांनी MMRDA आणि महापालिका अधिकाऱ्यांसह LBS रोडच्या दोन किलोमीटरच्या पट्ट्याची संयुक्त पाहणी केली होती. 55 हून अधिक ठिकाणी गंभीर निष्काळजीपणा आढळला. आम्ही GIS-टॅग केलेली १०० हून अधिक छायाचित्रे संकलित करून कंत्राटदाराविरुद्ध कारवाईची मागणी केली होती, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले. तसेच MMRDA आयुक्त संजय मुखर्जी यांना कंत्राटदाराचे ब्लॅकलिस्टिंग व निलंबन करण्याची मागणी करणारे पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी १०० हून अधिक GIS-टॅग केलेली छायाचित्रे सादर करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; पाच लाखांची मदत जाहीर

आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेची माहिती दिली असून त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार किंवा अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांना निलंबित केले जाईल आणि कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करून करार रद्द केला जाईल, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी नमूद केले.

जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार असून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले.

एमएमआरडीएने केली कारवाई

एमएमआरडीएने मेट्रो चारच्या दोषी कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांचा तर जनरल कन्सल्टंट अर्थात सल्लागाराला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >