नवी दिल्ली : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सैतेजा मुक्कामल्लाने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर शुभम रांजणेने शेवटी फलंदाजी करताना नाबाद ४८ धावा केल्या. या खेळीच्या बळावर अमेरिकेने ६ गडी बाद १९६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला. यासह अमेरिकेने हा सामना ९३ धावांनी आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला. कारण अमेरिकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. सलामीला आलेल्या मोनांक पटेलने ३६ धावांची खेळी केली. तर जहागीरने २० धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सैतेजा मुक्कामल्लाने ५१ चेंडूत ७९ धावांची दमदार खेळी केली. तर शेवटी शुभम रांजणेने २४ चेंडूत नाबाद ४८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार खेचले. या खेळीच्या बळावर अमेरिकेने २० षटकांअखेर ६ गडी बाद १९६ धावांचा डोंगर उभारला.
नेदरलँड्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. मायकल लेव्हिटने अवघ्या ३ धावा केल्या. तर मॅक्स ओ डाऊडने अवघ्या १३ धावा केल्या. तर बस डी लीडने २३ धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने जोर लावला. पण तो २० धावांवर माघारी परतला. नेदरलँड्स संघाचा डाव १०३ धावांवर आटोपला.
या सामन्यातील पहिल्या डावात अमेरिकेच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तर दुसऱ्या डावात गोलंदाजांनी नेदरलँड्सच्या फलंदाजांवर दबाव टाकला. नेदरलँड्सकडून हरमित सिंगने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर मोहम्मद मोहसीनने २ आणि शाल्क्विकचा शेडलीने ३ गडी बाद केले. अमेरिकेच्या फिरकी गोलंदाजांनी शेवटपर्यंत नेदरलँड्सच्या फलंदाजांवद दबाव बनवून ठेवला. परिणामी नेदरलँड्सचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला. हा अमेरिकेचा या स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला आहे.







