महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार
गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या सूचना
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात आजवर सत्तेत बसणाऱ्या उबाठालाच्या नगरसेवकांना विरोधी पक्षात बसताच तेथील आसनाचा त्रास होऊ लागला आहे. ज्या आसनांवर मागील २००२पासुुन बसून सत्ता उपभोगणाऱ्या माजी महापौर आणि उबाठाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांना आता या आसनावर बसण्यास आणि उठण्यास त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे महापौरांच्या दालनात झालेल्या अनौपचारिक बैठकीत सदस्यांना सुलभपणे बसता आणि उठता यावे अशा पध्दतीने आसन व्यवस्थेत बदल करण्याची शिफारस करण्यात आली. त्यामुळे मागील २००२पासून महापालिकेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांना जो त्रास झाला नाही तो त्रास आता विरोधी पक्षात बसल्यावर उबाठाच्या नगरसेवकांना होवू लागल्याचे दिसून येत आहे.
महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महापालिका सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांना बसण्यास जागा नसल्याने त्यांना उभेच राहावे लागले. त्यामुळे महापालिका सभागृहातील नगरसेवकांच्या आसन व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. या अनुषंगाने महापौरांच्या दालनात भाजप, उबाठा, शिवसेना, मनसे, एमआयएम आदींच्या गटनेत्यांच्या समवेत बैठक घेवून महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेबाबत चर्चा केली.
मुंबई महापालिकेचे २२७ अधिक पाच स्वीकृत नगरसेवक अशाप्रकारे २३२ नगरसेवकांची आसन व्यवस्था आहे. आणि आजही तेवढेच नगरसेवक आहेत. तसेच भविष्यात आणखी पाच स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. याअनुषंगाने झालेल्या बैठकीत विद्यमान आसन व्यवस्थेमध्ये सुसुत्रता आणली जावी अशाप्रकारची सूचना करण्यात आली. यामध्ये लटकते माईक ही व्यवस्था काढून प्रत्येक बाकांवर कॉडलेस माईकची अद्यायावत सुविधा देण्यात यावी. तसेच ध्वनीक्षेपकाच्या आवाजाचे नियंत्रण करणाऱ्या साऊंड सिस्टीम कंट्राेल मशीन्सची जागा इतर ठिकाणी बसवण्यात यावी.जेणेकरून तिथे महापालिका सचिव विभागाचे कर्मचारी बसून त्या जागांवर नगरसेवक बसू शकतील.
तसेच सभागृहातील पुतळ्यांनी जागा अडवली असली तर त्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे सौदर्य अबाधित राखून नगरसेवकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात यावी अशीही सूचना गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती भाजपाचे महापालिका गटनेते आणि भावी सभागृहनेते गणेश खणकर यांनी माहिती दिली.
तसेच सभागृहातील आसनाची जागा बसण्यास योग्य नसून एकदा बसल्यानंतर उठणे कठिण होवू बसते. काही ज्येष्ठ नगरसेवकांना बसताना आणि उठतानाही त्रास होत आहे. मऊशाल आसने ही दिसायला योग्य असली तरी त्यावर अडीच ते तीन तास बसणे योग्य ठरत नाही.त्यामुळे मऊशाल आसन व्यवस्था सुधारण्यात यावी,जेणेकरून सदस्यांना तिथे बसल्यानंतर उठताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशाप्रकारची भावना किशोरी पेडणेकर यांच्यासह गणेश खणकर यांनी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला.
मात्र, २००२पासून मुंबईत महापालिकेतील या नुतनीकरण केलेल्या सभागृहात नगरसेवक बसत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकांनी याच सभागृहात सत्तेचा गाढा हाकला आहे. परंतु, सत्ताकाळात उबाठा आणि पहारेकरी असताना भाजपच्या नगरसेवकांना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास आत्ताच जाणू लागला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या नगरसेवकांना सभागृहात बसण्याचा त्रास होत नव्हता का? सभागृह उशिरा सुरु करून नगरसेवकांना प्रतीक्षेत बसायला भाग पाडणाऱ्या उबाठाच्या नगरसेवकांना विरोधी पक्षात बसल्यानंतर मऊशाल आसनाचा त्रास होऊ लागला आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे प्रथम उजव्या बाजुला बसताना न टोचणारी आसने आता डाव्या बाजुला बसायला लागल्यानंतर आसने टोचू लागली का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.







