एकत्रिकरणाचं भवितव्य

ज्यांच्या आग्रहाखातर दादा वेगळे झाले, त्या बहुतेक सगळ्या नेत्यांचा दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाला विरोध होता, हे त्यांनाही माहीत होतं. त्यांचा तो विरोध आजही दिसतो आहेच. या विरोधाला काही तात्त्विक, वैचारिक आधार आहे, असं नाही. शुद्ध व्यावहारिक आहे. अजितदादांच्या वारसदारांना याची व्यवस्थित कल्पना आहे.


२८जानेवारीच्या सकाळी बारामतीत दुर्दैवी विमान अपघात झाला नसता, त्यात अजितदादा पवार यांचं निधन झालं नसतं, तर आज कदाचित सर्व वृत्तपत्रांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाच्या बातम्यांचे मथळे असते. 'कदाचित' म्हणण्याचं कारण एवढंच, की दिशा निश्चित होती; पण प्रक्रियेचे तपशील ठरत होते. दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांविरोधात सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असल्याने काही तांत्रिक बाबी आडव्या येऊ शकल्या असत्या. शिवाय, राजकीय घडामोडींत कधी कोणते फाटे फुटतील, हे सांगता येत नसतं. त्यामुळे, एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडत नाही, तोपर्यंत त्याबाबत खात्रीने बोलण्याला काही अर्थ नसतो. 'घड्याळ'वाल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते 'अशी काही चर्चा सुरू असल्याचं आम्हाला माहीत नव्हतं. तसं असतं, तर दादा आमच्याशी बोलले असते' असं सुरुवातीला म्हणाले. पण, त्यानंतर संबंधितांकडून चर्चेच्या फेऱ्यांचे अनेक तपशील, चित्रफितीच दाखवल्या गेल्याने या नेत्यांकडून पुन्हा तशा प्रकारचं वक्तव्य झालं नाही. आता उघड झालेल्या एकूण तपशिलावरून अशी चर्चा सुरू होती आणि खुद्द अजितदादाच त्यासाठी आग्रही होते, असं दिसतं. या चर्चेतील खाचाखोचा ते आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना किती सांगत असतील, हा प्रश्न आहे. कारण, ज्यांच्या आग्रहाखातर दादा वेगळे झाले, त्या बहुतेक सगळ्या नेत्यांचा दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाला विरोध होता, हे त्यांनाही माहीत होतं. त्यांचा तो विरोध आजही दिसतो आहेच. या विरोधाला काही तात्त्विक, वैचारिक आधार आहे, असं नाही. शुद्ध व्यावहारिक आहे. अजितदादांच्या वारसदारांना याची व्यवस्थित कल्पना आहे. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड, पदग्रहणापूर्वीचे सोपस्कार, दिल्ली भेटीसाठीचा आग्रह या वारसदारांना समजत नाही, असं नाही. पण, आत्ताच काही भूमिका जाहीर करण्याची गरज नाही. सगळ्यांचं ऐकून, प्रत्येकाची पावलं कुठे पडतात हे नीट समजावून घेऊन मगच आपली भूमिका स्पष्ट करण्याचं त्यांनी ठरवलं असावं. कुठेही काहीही न बोलता सरकारमधील, पक्षातील; अगदी पक्ष संघटनेतील घडी बसवण्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं दिसतं. आजच्या घडीला हेच धोरण योग्य आहे. अजितदादांचे वारसदार नवखे किंवा अपरिपक्व आहेत, त्यांना आपल्यालाच पुढे घेऊन जायचं आहे, असा समज कोणी करून घेतला असेल, तर त्यांना लवकरच ठेच लागण्याची शक्यता यावरून दिसते.
दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या, तेव्हांही त्याबाबतच्या चर्चा वेगवेगळ्या पातळ्यांवर कितीतरी दिवस सुरू होत्या. तेव्हांही पक्षात आणि पवार कुटुंबात अशा दोन्ही आघाड्यांवर स्वतंत्रपणे बोलणी होत होती. दोन्ही बाजूला अग्रभागी पवार कुटुंबातील व्यक्तीच असल्याने साहजिकच त्यावेळीही 'केवळ पक्षात फूट, की कुटुंबात दरी?' अशा प्रकारच्या चर्चा झाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी जे आग्रही होते, त्यातील प्रत्येकाची त्या आग्रहामागे वेगवेगळी कारणं होती. त्याची चर्चाही त्यानंतर पुष्कळ झाली होती. पण, तो निर्णय घेण्याच्या काळात स्वतः अजितदादा किती तणावात होते, याची कल्पना भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह राजकीय वर्तुळालाही आहे. दोन राष्ट्रवादी स्वतंत्र झाल्यानंतरही सुरुवातीचे काही महिने सोडले, तर नंतर दोन्ही बाजूंनी परस्परांवरचे वार थांबले होते. विधिमंडळाच्या अधिवेशन काळात दोन्ही पक्षांचे नेते आणि आमदार किती समन्वयाने वावरायचे, हे तर जगजाहीर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी अनेक ठिकाणी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीत शहा यांची भेट घेऊन त्यांना त्याची कल्पनाही दिली होती. भाजपसारख्या तगड्या पक्षाच्या युतीत असताना त्यांच्या संमतीशिवाय असा काही निर्णय कोणी पक्ष परस्पर घेईल, हे संभवत नाही. म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली निवडणूक आघाडी ही भाजपला पूर्ण अवगत होती आणि त्यांची त्याला मूळ संमती होती, असं मानायला जागा आहे. भाजपचं केंद्रीय नेतृत्व राजकीय परिणामांचा विचार केल्याशिवाय आणि एखाद्या राजकीय घडामोडीचं पूर्ण तार्किक चित्र स्पष्ट असल्याशिवाय गाफीलपणे परवानगी देणंही शक्य वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींची माहिती महायुतीतल्या अन्य पक्षांच्या वरिष्ठ वर्तुळात असणार असा निष्कर्ष यावरूनच काढला जातो आहे. राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी याही गोष्टीचा विचार उघड वक्तव्य करण्याआधी करायला हवा. अर्थात याविषयी आता कोणी उघड कबुली देण्याचा किंवा दुजोरा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण, त्या अपघाताने सर्व समीकरणंच बदलून गेली आहेत. एकत्रिकरणाचा विचार करणारे आपापला विचार करताहेत; पण हे एकत्रिकरण ज्या राजकीय चित्राचा भाग होतं, त्या चित्रातल्या अनेक घटकांची आताच्या घडीची गरज, सोय काय आहे, याचा विचार कोणी करतं आहे, असं दिसत नाही. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली भेटीतही या विषयावर चर्चा झाल्याचं काही ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे. त्याचे तपशील एक - दोन दिवसात कळतील. जर चर्चा झालीच असेल, तर बदललेल्या परिस्थितीत भाजपची भूमिका काय आहे, त्यांचा कल कुठे आहे, हे तिथे उपस्थित असलेल्यांना कळलंच असेल. राष्ट्रवादीतले प्रमुख चार-पाच नेते या एकत्रिकरणाला जो विरोध करताहेत, त्याची दखल भाजप कशी घेणार आहे, यावरच या 'चर्चेतल्या एकत्रिकरणा'चं भवितव्य अवलंबून आहे. अजितदादा या एकत्रिकरणाला तयार होते, त्यामागे राजकीय कारणांपेक्षा भावनिक कारणं जास्त होती, असं म्हणतात. ती भावनिक कारणं त्यांच्या वारसांच्या दृष्टीने किती महत्त्वाची ठरतात, हा मुद्दा आहेच. शिवाय, ही प्रक्रिया नेटाने पुढे नेण्याएवढी तीव्र इच्छाशक्ती आता कुणाकडे असण्याचं कारण नाही, ही वस्तुस्थितीही लक्षात घ्यावी लागेल. आधी कुटुंब; मग पक्ष याच क्रमाने ही दुरुस्ती व्हायची तेव्हां होईल.

Comments
Add Comment

पेरले ते उगवले

पाकिस्तानातील मशिदीतील स्फोटाची जबाबदारी घेणारा आयसिस म्हणजे इराक आणि सीरीयातील सुन्नी मुस्लिम गट आहे.

आडवा टँकर

१७ टन ज्वालाग्रही वायू कोचीहून गुजरातला घेऊन जाणाऱ्या या टँकरला मार्गात आणखी शंभर प्रकारच्या अडचणी येऊ शकल्या

चोरीचा मामला

भारतीय दंड संहितेच्या कलम ३७८ नुसार चोरी म्हणजेच, वस्तू पळविण्याचा एक गंभीर गुन्हा आहे. एखाद्याच्या संमतीशिवाय

अंकल सॅमचा मदतीचा हात

सगळ्या जगावर टॅरिफ युद्ध लादणारे अंकल सॅम यांनी अखेर नमते घेतले. भारतावर लादलेले ५०% टॅरिफ १८ टक्क्यांवर

महाराष्ट्राला लॉटरी

मुंबई, पुणे आणि नागपूर ही महाराष्ट्राची महत्त्वाची शहरे आणि येथेच सर्वाधिक प्रकल्प येत आहेत. त्यामुळे या

सुनेत्रा पर्वाचे संकेत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे मोठे