वार्तापत्र : मराठवाडा
मराठवाड्यातील परभणी महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लीम महापौर खुर्चीवर बसविला. सय्यद इक्बाल यांची परभणीच्या महापौरपदी निवड झाली, तर काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर म्हणून निवडून आले. परभणीमधील मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करताना स्वप्नातही मुस्लीम महापौरांचा विचार केला नसेल. मतदारांची ठाकरेंच्या शिवसेनेकडून चक्क फसवणूक झाल्याची भावना मराठवाड्यात निर्माण झाली आहे.
हिंदुत्वाची कास धरून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा हा केवळ हिंदुत्ववाद या मुद्द्यामुळेच होता. एकेकाळी महाराष्ट्रात ठाकरेंचे नाव घेताच समोरच्यांचा थरकाप उडत असे. मराठवाड्यात देखील ठाकरेंच्या शिवसेनेचा एक वेगळाच वलय होता. ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करताना मतदार नेहमी स्वतःची सुरक्षा व हिंदुत्ववाद जपणारा पक्ष म्हणून ठाकरे ब्रँडकडे पाहत होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे मराठवाड्यात सर्वाधिक नगरसेवक निवडले गेले.
'मराठवाड्यातील परभणी महानगरपालिकेत एकूण ६५ जागांसाठी निवडणूक झाली. त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडू जाधव हे खासदार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ६५ पैकी २५ नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आले. तसेच काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आल्याने ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस या दोघांकडे सत्तेची सूत्रे आली. ज्या ज्या मतदारांनी हिंदुत्वाचा पक्ष म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केले, त्यांना वाटले असेल की मराठवाड्यात आता ठाकरेंचा महापौर हा हिंदू असेल; परंतु चक्क मतदारांच्या काळजाला लागणारी बाब महापौर निवडीवरून समोर आली. ठाकरेंच्या शिवसेनेने परभणीत महापौरपदावर बसण्याची संधी सय्यद इक्बाल यांना दिली. त्यांना काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी साथ दिली. ३९ मते घेऊन मुस्लीम समुदायाचे सय्यद इकबाल हे महापौर म्हणून विराजमान झाले.
१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला; परंतु मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला. मराठवाड्यावर एकेकाळी मुघलांचे राज्य होते. पूर्वी मुस्लिमांच्या तावडीत असलेला मराठवाडा आता हळूहळू पुन्हा मुस्लीम नगरसेवक ताब्यात घेत आहेत, अशी धारणा मराठवाड्यातील नागरिकांची होत आहे. तेलंगणा राज्यातील एमआयएम या पक्षाने नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून मराठवाड्याच्या राजकारणात प्रवेश केला. एमआयएम या पक्षाने महानगरपालिकेत मते मिळविण्यासाठी मुस्लीमबहुल भागाची निवड केली व स्वतःची ताकद दाखवून दिली. सध्या राज्यसभेचे खासदार असलेले नांदेडचे अशोक चव्हाण यांनीच एमआयएम पक्षाला नांदेड महापालिकेत आणले असे बोलले जाते. मत विभागणीसाठी खासदार अशोक चव्हाण यांनी केलेला तो प्रयत्न स्थानिक राजकारणासाठी यशस्वी ठरला असला तरी भविष्यात मराठवाड्यात हिंदू विरुद्ध मुस्लीम असेच मतदान पाहावयाला मिळणार आहे. परभणी हा जिल्हा ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ओळखला जात असला तरी त्या ठिकाणी असलेले मतदार हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यांना मुस्लीम महापौर मान्य असेल असे अनेकांना वाटत नाही. परभणीतील ठाकरेंच्या शिवसेनेने निवडलेला महापौर हा भविष्यात मराठवाड्यातील राजकीय चित्र नक्कीच बदलविणारा निर्णय ठरणार आहे. ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत थेट हिंदू विरुद्ध मुस्लीम असे वातावरण निर्माण केले जाते. तीच परिस्थिती आता भविष्यात परभणी येथे दिसणार यात कोणाचेच दुमत नाही. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत नांदेडमध्ये देखील एमआयएम पक्षाने चांगलेच यश मिळविले. नांदेड महानगरपालिकेत एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. एमआयएम पक्षाचे निवडून आलेले जवळपास सर्वच नगरसेवक हे पूर्वी खासदार अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाचेच नेतृत्व करत होते. परभणी महानगरपालिकेच्या महापौर निवडीवरून भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मराठवाड्यात थारा मिळणार नाही, हे मात्र आता उघड होत आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसची सत्ता येईल असे वाटत असताना ऐन वेळेला त्या ठिकाणी भाजपचा महापौर खुर्चीवर बसविण्यात श्रेष्ठींना यश आले. तसाच प्रयोग परभणीत होईल की काय, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना या ठिकाणी मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपदाची खुर्ची मिळविण्यात यश मिळाले. ठाकरे यांच्या शिवसेनेने खुर्ची मिळविली असली तरी हिंदुत्ववादी मतांचा विश्वास त्यांनी नक्कीच गमावला, असे मराठवाड्यातून बोलले जात आहे. ठाकरेंनी सय्यद इक्बाल यांची महापौर पदासाठी निवड करून नेमका महाराष्ट्राला काय संदेश दिला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
ज्या मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईत तसेच ठाण्यात निवडणुकीचा प्रचार केला, त्याच मराठीच्या मुद्द्याला परभणीत मात्र मुस्लीम महापौर निवडीने काळिमा फासल्याची भावना परभणीकरांच्या मनात निर्माण झाली आहे. परभणीतील हिंदुत्ववादी मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपला ही एक आयती संधी आलेली आहे. भविष्यात परभणीला भाजपचा गड बनविण्यासाठी त्या ठिकाणी भाजपने आपले पाय रोवणे आवश्यक आहे. राज्यात नेतृत्व करत असलेल्या मेघना बोर्डीकर यांना भाजपने बळ दिले असले तरी त्यांच्यात परभणी व परिसरातील मतदारांना भाजपकडे ओढण्याची ताकद नाही, हे देखील तेवढेच खरे आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी इतर अन्य नेत्यांवर परभणीची जबाबदारी टाकल्यास भविष्यात भाजपला ते फायद्याचे ठरणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेवर असलेला हिंदुत्ववादी मतदारांचा विश्वास संपल्यात जमा आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात उरली-सुरली ठाकरेंची शिवसेना भविष्यात दिसणार नाही, असे बोलले जात आहे.





