Friday, February 13, 2026

वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनचे दमदार पदार्पण

वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनचे दमदार पदार्पण

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे. आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील १८ व्या साखळी सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आले. अभिषेक शर्मा रुग्णालयात असल्यामुळे ईशान किशन आणि संजू सॅमसन ही जोडी सलामीला आली. संजू सॅमसनने वर्ल्डकपमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने आठ चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार मारत २७५ च्या स्ट्राईक रेटने २२ धावा केल्या. संजूचा हा झंझावत बेन शिकोंगोच्या चेंडूवर लॉरेन स्टीनकॅम्पने कॅच पकडल्यामुळे थांबला.

ईशान किशनने २४ चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकार मारत २५४.१७ च्या स्ट्राईक रेटने ६१ धावांची वेगवान खेळी केली. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर बेन शिकोंगोने त्याचा कॅच पकडला. तिलक वर्मा २१ चेंडूत ३ चौकार मारत ११९.०५ च्या स्ट्राईक रेटने २५ धावा केल्यानंतर गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर स्मिट बोल्डकडे कॅच देऊन परतला. कर्णधार सूर्यकुमार यादव (९२.३१ स्ट्राईक रेट) १३ चेंडूत १२ धावा करून बर्नार्ड स्कोल्झच्या चेंडूवर झेन ग्रीनने यष्टीचीत केल्यामुळे परतला.

भारत : संजू सॅमसन , इशान किशन (यष्टीरक्षक) , तिलक वर्मा , सूर्यकुमार यादव (कर्णधार) , हार्दिक पांड्या , शिवम दुबे , रिंकू सिंग , अक्षर पटेल , अर्शदीप सिंग , वरुण चक्रवर्ती , जसप्रीत बुमराह

नामिबिया : लॉरेन स्टीनकॅम्प , जॅन फ्रायलिंक , जॅन निकोल लॉफ्टी-ईटन , गेरहार्ड इरास्मस (कर्णधार) , जेजे स्मित , मालन क्रुगर , झेन ग्रीन (यष्टीरक्षक) , रुबेन ट्रम्पेलमन , बर्नार्ड स्कोल्झ , बेन शिकोंगो , मॅक्स हींगो

Comments
Add Comment