Thursday, February 12, 2026

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ नामिबिया विरुद्धचा सामना भारताने ९३ धावांनी जिंकला. सलग दोन साखळी सामने जिंकल्यामुळे भारत ए ग्रुप अर्थात अ गटात चार गुण आणि +३.०५० च्या नेट रनरेटसह अव्वलस्थानी आहे. गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानचेही चार गुण आहेत पण त्यांचा नेट रनरेट +०.९३२ आहे. यामुळे रविवारी होणार असलेल्या भारत - पाकिस्तान सामन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.

नामिबिया विरोधात असा जिंकला भारत

नामिबियाने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या भारताने २० षटकांत नऊ बाद २०९ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या नामिबियाचा डाव १८.२ षटकांत ११६ धावांवरच आटोपला. यामुळे भारताचा ९३ धावांनी विजय झाला. नामिबिया विरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने १८५.७१ च्या स्ट्राईक रेटने खेळत २८ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकार मारत ५२ धावा केल्या. तसेच चार षटकांत २१ धावा देत बर्नार्ड स्कोल्झ (४ धावा) आणि बेन शिकोंगो (शून्य धावा) या दोघांना बाद केले. यामुळे हार्दिक पंड्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

नामिबियाची फलंदाजी

नामिबियाकडून लॉरेन स्टीनकॅम्पने २९, जॅन फ्रायलिंकने २२, जॅन निकोल लॉफ्टी-ईटनने १३, कर्णधार असलेल्या गेरहार्ड इरास्मसने १८, जेजे स्मितने शून्य, झेन ग्रीनने ११, मालन क्रुगरने ५, रुबेन ट्रम्पेलमनने ६, बर्नार्ड स्कोल्झने ४, बेन शिकोंगोने शून्य, मॅक्स हींगोने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. भारताकडून वरुण चक्रवर्तीने ३ तर हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. शिवम दुबे, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताची फलंदाजी

अभिषेक शर्मा रुग्णालयात असल्यामुळे ईशान किशन आणि संजू सॅमसन ही जोडी सलामीला आली. संजू सॅमसनने वर्ल्डकपमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने आठ चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार मारत २७५ च्या स्ट्राईक रेटने २२ धावा केल्या. संजूचा हा झंझावत बेन शिकोंगोच्या चेंडूवर लॉरेन स्टीनकॅम्पने कॅच पकडल्यामुळे थांबला. ईशान किशनने २४ चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकार मारत २५४.१७ च्या स्ट्राईक रेटने ६१ धावांची वेगवान खेळी केली. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर बेन शिकोंगोने त्याचा कॅच पकडला. तिलक वर्मा २१ चेंडूत ३ चौकार मारत ११९.०५ च्या स्ट्राईक रेटने २५ धावा केल्यानंतर गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर स्मिट बोल्डकडे कॅच देऊन परतला. कर्णधार सूर्यकुमार यादव (९२.३१ स्ट्राईक रेट) १३ चेंडूत १२ धावा करून बर्नार्ड स्कोल्झच्या चेंडूवर झेन ग्रीनने यष्टीचीत केल्यामुळे परतला.

हार्दिक पंड्याने ४ षटकार आणि ४ चौकार मारत १८५.७१ च्या स्ट्राईक रेटने २८ चेंडूत ५२ धावा केल्या. गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर डायलन लीचरने त्याचा कॅच पकडला. शिव दुबे धावचीत झाला. त्याने १६ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारत २३ धावा केल्या. रिंकू सिंग अपयशी ठरला, तो ६ चेंडूत एक धाव करून स्मितच्या चेंडूवर गेरहार्ड इरास्मसकडे कॅच देून परतला. पाठोपाठ अक्षर पटेलही शून्य धावा करून गेरहार्ड इरास्मसच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. वरुण चक्रवर्ती एक धाव करून नाबाद राहिला तर अर्शदीप सिंग २ धावा करून धावचीत झाला. नामिबियाकडून गेरहार्ड इरास्मसने चार तर बर्नार्ड स्कोल्झ, जेजे स्मित आणि बेन शिकोंगोने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >