मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या फेरीवाल्यांविरोधात प्रत्येक विभागात धडक कारवाई सुरु असून सलग चौथ्या दिवशीही दादर रेल्वे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाई सुरुच आहे. दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील पोलिस आणि महापालिकेच्यावतीने संयुक्तपणे कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे दादर परिसर फेरीवालामुक्त झाल्याचे दिसून आहे. मात्र, ही कारवाई किती दिवस असेल असा सवाल दादरकरांकडून केला जात आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांविरोधातील कारवाई जोरात सुरु आहे. महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तसेच पदपथांवरील अतिक्रमण हटवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून बोरीवली,मुलुुंड, वरळी, लोअर, मोहम्मद अली रोड, कुर्ला, दादर पूर्व आदी भागांतील कारवाई जोरात सुरु आहे.त्यातच दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या बाजुला तसेच केशवसूत उ्डाणपुलाखाली सर्व गाळ्यांसह रानडे मार्ग, सेनापती बापट मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, जावळे मार्ग तसेच केळकर मार्ग आदी ठिकाणी मागील सोमवारपासून जोरदार कारवाई करून सर्वच फेरीवाल्यांना पोलिस आणि महापालिकेच्यावतीने हटवले जात आहे. त्यामुळे मागील सोमवारपासून दादर पश्चिमचा परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांकडून आता दिलासा व्यक्त केला जात असून ही कारवाई पुढेही कायम ठेवण्याची मागणी होत आहे.
महापालिकेच्यावतीने दादर पश्चिम रेल्वे स्थानकाला पडलेला फेरीवाल्यांचा विळखा सोडवला जात नसल्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी रुग्णवाहिकेतून याचे व्हिडीओ शुटींग करत एका रुग्णवाहिकेला दादरमधून बाहेर पडताना किती वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो याचा पुरावा दिला.त्यानंतर त्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याच्या हालचाली केल्या होत्या. परंतु सत्यस्थिती दर्शवल्यानंतर पोलिस आणि महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यास सुरुवात झाली असून सोमवारपासून फेरीवाला मुक्त केलेला दादर गुरुवारीही तसाच दिसून आला. त्यामुळे या कारवाईचे समर्थन करणाऱ्या दादरकरांकडून आता मात्र, ही कारवाई पुढेही कायम राहावी अशी मागणी केली जात आहे. दादरकरांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेने किमान न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर अंतरापर्यंत तरी कारवाई कायम राखावी, जेणेकरून दादरकरांना गर्दीतून अडखळत स्थानक आणि घर गाठण्याची वेळ येणार नाही.







