Wednesday, February 11, 2026

मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी; तब्बल ४४ वर्षांनी भाजपचे महापौरपदाचे स्वप्न झाले साकार

मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी; तब्बल ४४ वर्षांनी भाजपचे महापौरपदाचे स्वप्न झाले साकार

महापालिकेवर भाजपचा भगवा अखेर फडकलाच

मुंबई : मुंबईच्या महापौरपदी अखेर भाजपचा महापौर विराजमान झाला. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर न केल्याने निवडणुकीची औपचारिकता पार पडत पिठासीन अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय घाडी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे तब्बल ४४ वर्षांनी भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होत खऱ्या अर्थाने महापालिकेवर भाजपचा भगवा डौलाने फडकला गेला. मुंबईचे ७८ वे महापौर म्हणून भाजपच्या रितू तावडे हे निवडले गेल्या असून मागील चार दशकांचे भाजपचे स्वप्न साकार झाले आहे.

मुंबई महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बुधवारी दुपारी पार पडली. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी कामकाज पाहिले. महापालिका सचिव यांनी प्रत्येक विभागाच्या संख्याबळानुसार जागा निश्चित केल्यानंतर सर्व प्रथम भाजपचे नगरसेवक हे पिठासीन अधिकाऱ्यांच्या उजव्या बाजुला जावून बसले, त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक आणि मनसे, एमआयएम, समाजवादी पक्षाचे नगरसवेक सभागृहात दाखल झाल्यानंतर उबाठाचेही नगरसेवक घोषणाबाजी देत सभागृहात दाखल झाले. त्यामुळे भाजप आणि उबाठाच्या नगरसेवकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली. भाजपकडून मोदी.. मोदी... अशी घोषणा होत असतानाच उबाठाकडून ठाकरे... ठाकरे... अशाप्रकारच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. या घोषणाबाजीतच दुपारी १२.०७ वाजता पिठाासीन अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली. वंदे मातरमने सभागृहाला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले.

प्रतयक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होतात उबाठा गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे पिठासीन अधिकारी म्हणून प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी आणि डॉ भूषग गगराणी यांची नेमणूक करण्याचा अध्यादेश नगरविकास खात्याने जारी केल्याने या अध्यादेशाचा निषेध व्यक्त करत आजवरच्या प्रथा आणि परंपरेला छेद दिल्याचा आरोप केला. पण पिठासीन अधिकारी यांनी यावर उत्तर देत त्यांचा मुद्दा उडवून लावला. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी निवडणुकीला सुरुवात करत, महापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने रितू तावडे यांची निवड महापौर पदासाठी करत असल्याचे घोषित केले. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी उपमहापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने संजय घाडी यांची निवड उपमहापौर पदासाठी करत असल्याचे घोषित केले. या दोघांच्या निवडीनंतर सर्व सदस्यांनी बाके वाजवत त्यांचे स्वागत केले. तर भाजपच्या नगरसेवकांनी भारत माता की जय... वंदे मातरम... भारत माँ का एकही नारा, जय श्रीराम जय श्रीराम.. अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पिठासीन अधिकारी आणि महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पुष्पगुष्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री,उपमुख्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत दिल्या शुभेच्छा

याचवेळी महापालिका सभागृहातील प्रेक्षागॅलरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसून हा या निवडणुकीचा कार्यक्रम अनुभवला. त्यानंतर सभागृहामध्ये येत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महापौरपदी निवड झाल्यामुळे रितू तावडे आणि उपमहापौरपदी निवड झाल्यामुळे संजय घाडी यांना पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.

सभागृहात उबाठाच्या नगरसेवकांनी महापौरांसह उपमहापौरांच्या भाषणाच्या प्रती फाडून फेकल्या

महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौरांनी सभागृहात भाषण करत आगामी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. या भाषणाच्या प्रती सभागृहात सदस्यांना वाटण्यात आल्या होत्या. परंतु काँग्रेसच्या गोंधळातही महापौरांनी आपले भाषण उरकून घेतले तर उपमहापौर संजय घाडी हे भाषणाला सुरुवात करताच उबाठाच्या नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर उबाठाने त्यांच्या भाषणांच्या प्रती फाडून सभागृहात फेकत सभात्याग केला. त्यामुळे पहिल्याच सभेत उबाठाच्या नगरसेवकांनी गैरवर्तन करत पुढील पाच वर्षांमधील रणनिती स्पष्ट केली.

Comments
Add Comment