मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया विरोधात होणार आहे. हा सामना होण्याआधीच भारतीय संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवणारी एक बातमी आली आहे. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे नामिबिया विरोधात अभिषेक खेळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
अभिषेक शर्मा ताप आला आहे आणि अशक्तपणा जाणवत आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्याआधीपासूनच तो आजारी होता. पण त्यावेळी औषधं घेऊन खेळलेला अभिषेक आता तब्येत खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाला आहे. डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अभिषेकवर उपचार सुरू आहेत. तब्येतीला लगेच आराम पडावा यासाठी अभिषेकला सलाईनवर ठेवले आहे.
आजारी असल्यामुळे डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये संघाच्या सराव सत्राला गैरहजर होता. त्याचे पोट बिघडले आहे आणि औषधोपचार सुरू आहेत असे सुरुवातीला सांगितले जात होते. पण आता अभिषेकला रुग्णालयात दाखल केल्यामुळे तो नामिबिया विरोधात खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.
सध्या आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये ए ग्रुप अर्थात अ गटात पाकिस्तान पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत आणि त्यांच्याकडे चार गुण आहेत. भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना जिंकला आहे. यामुळे भारत दोन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. नेदरलँडने त्यांचा दोन पैकी एक सामना जिंकला आहे. यामुळे ते तिसऱ्या स्थानावर आहेत. नामिबिया चौथ्या तर अमेरिका पाचव्या स्थानावर आहे.







