सरसंघचालकांच्या उद्बोधनावर ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला दिले प्रत्युत्तर
मुंबई : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला हिंदू आहे. उद्धव ठाकरे खरेच हिंदू आहेत का, हे तपासण्याची वेळ आली आहे. सलमान खानने किमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. पण, उद्धव ठाकरे कधी राहुल गांधींच्या समोर स्वतःच्या वडिलांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची हिंमत दाखवतील का, हे उद्धव किंवा संजय राऊतांना विचारा”, असा हल्लाबोल राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत केलेल्या उद्बोधनावर राज ठाकरे आणि अन्य विरोधकांनी केलेल्या टीकेचा मंत्री राणे यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. सरसंघचालकांनी भाषेविषयी केलेल्या विधानावर राज ठाकरेंनी आक्षेप घेत समाज माध्यमांवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “रा. स्व. संघाच्या कार्यक्रमात मी स्वतः उपस्थित होतो. आदरणीय सरसंघचालकांनी भाषेविषयी जे विचार मांडले, त्याविषयी ज्यांनी राज ठाकरेंना माहिती दिली, ती कदाचित चुकीची असावी. सरसंघचालकांनी, राष्ट्रभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे म्हटले. त्यासोबतच त्यांनी भारतभरातील भाषांविषयी सखोल विश्लेषण केले, त्याबद्दल राज ठाकरेंना कुणी माहिती दिलेली दिसत नाही. राज ठाकरेंनी जे ट्वीट सरसंघचालकांच्या भाषणाबद्दल केले, तशाप्रकारचे ट्वीट ते कुणा मौलवीच्या भाषणाबाबत करताना दिसत नाहीत. उद्याची अजान मराठीत करा, असे ते सांगत नाही. मालेगाव किंवा मुंब्र्यात जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरत नाहीत. हिंदुत्वाविरोधी द्वेष पसरवून पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खूश करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच जनतेने यांना घरी बसवले आहे”, असेही राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे सगळ्यात रटाळ:
सरसंघचालकांचे भाषण म्हणजे रटाळ प्रवचन होते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री नितेश राणे म्हणाले, तुमचा भाऊ उद्धव ठाकरे सगळ्यात रटाळ भाषण करतो. सकाळी लवकर उठून त्या कार्यक्रमाला आला असता, तर सरसंघचालकांच्या बौद्धिकातून हिंदुत्व नेमके काय आहे, याचा बोध झाला असता. बाळासाहेबांचे हिंदुत्व नेमके कसे आहेत, लोक तुम्हाला का सोडून चालले आहेत, हे तुमच्या लक्षात आले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपला आता ‘एक नंबर’ची सवय:
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपला आता एक नंबरची सवय झाली आहे. एक नंबर आणि भाजप म्हणजे फेविकॉलचा मजबूत जोड आहे. त्यामुळे विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेने आम्हाला भरघोस मतदान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, हे या सर्व निवडणुकीत वारंवार सिद्ध झाले आहे.
कोकण हा भाजप आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचा स्ट्राईक रेट ९० टक्के आहे. उबाठाला जिल्हा परिषदेत केवळ ३ जागा मिळाल्या. आता कोकण आणि महाराष्ट्रातील जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला, तो सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. लोकांना दिलेला शब्द कृतीद्वारे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. अनेक ठिकाणी अपक्ष किंबहुना एमआयएमपेक्षाही ठाकरेंना कमी जागा मिळाल्या. याचा अर्थ ठाकरेंच्या विकासविरोधी राजकारणाला मतदारांनी साफ नाकारले आहे, अशी टीका राणे यांनी केली.