Tuesday, February 10, 2026

पक्ष विलीकरणाच्या चर्चा, तरीही सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा ठरला; मोदी-शहांची लवकरच होणार भेट

पक्ष विलीकरणाच्या चर्चा, तरीही सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा ठरला; मोदी-शहांची लवकरच होणार भेट

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या महिन्यात विमान अपघातात निधन झाले. आणि प्रश्न निर्माण झाला तो राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाचा याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या अनेक भेटी झाल्या. आणि या भेटींमुळेच पक्षाच्या एकत्रीकरण्याच्या चर्चेला आणखी उधाण आले. सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची बैठक झाली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती, पक्षाची पुढील दिशा आणि भविष्यातील निर्णयांबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.या बैठकीनंतरच सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याच्या हालचालींना गती मिळाल्याचे दिसून येत आहे.

सुनेत्रा पवार मुंबईत मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होणार असून, प्रशासकीय कामकाज पूर्ण केल्यानंतर त्या आजच दिल्लीकडे रवाना होणार आहेत. दिल्लीमध्ये त्या महाराष्ट्र सदन येथे मुक्काम करणार असल्याची माहिती आहे.

दिल्ली दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या भेटींमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेबाबत संवाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्ली दौरा केला होता. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानीत जात असल्याने राज्यातील राजकीय हालचाली अधिकच लक्षवेधी ठरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे भवितव्य, स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा निर्णय की व्यापक राजकीय आघाडीत भूमिका यावर चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.

याच काळात बारामतीत पवार कुटुंबीयांच्या बैठका झाल्या होत्या. त्यानंतर शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती समोर आली. व्हायरल संसर्गामुळे त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकीकडे शरद पवारांवर उपचार सुरू असताना, दुसरीकडे सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि संभाव्य उच्चस्तरीय भेटी यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांत महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >