Tuesday, February 10, 2026

EPFO 3.0 : नोकरदारांसाठी मोठी बातमी : आता पीएफचे पैसे मिळतील एका क्लिकवर, 'ही' आहे महत्त्वाची तारीख!

EPFO 3.0 : नोकरदारांसाठी मोठी बातमी : आता पीएफचे पैसे मिळतील एका क्लिकवर, 'ही' आहे महत्त्वाची तारीख!

नवी दिल्ली : देशातील सुमारे ८ कोटी नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कार्यप्रणालीत ऐतिहासिक बदल करण्याच्या तयारीत असून, एप्रिल २०२६ पासून 'EPFO 3.0' हे नवीन तंत्रज्ञान लाँच केले जाणार आहे. या अंतर्गत पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया आता थेट UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) शी जोडली जाणार आहे. नव्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी आता क्लेम फॉर्म भरून कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची किंवा दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. सदस्य त्यांच्या UPI पिनचा वापर करून थेट आपल्या लिंक केलेल्या बँक खात्यात पैसे वळवू शकतील. आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घराच्या कामासाठी लागणारा निधी आता कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय अवघ्या ३ दिवसांत बँक खात्यात जमा होईल. पीएफ काढण्याची ही पद्धत एखाद्या साध्या बँक ट्रान्सफर इतकीच सोपी होणार असल्याने नोकरदार वर्गातून या निर्णयाचे मोठे स्वागत केले जात आहे.

पीएफमधून पैसे काढण्यावर मर्यादा ?

EPFO द्वारे एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या UPI सुविधेचे नेमके स्वरूप कसे असेल, याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. नव्या 'डिजिटल सेटलमेंट' प्रणालीनुसार, कर्मचाऱ्यांना तातडीच्या गरजांसाठी एका व्यवहाराद्वारे २५,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढता येण्याची शक्यता आहे. केवळ गरजा पूर्ण करणे हाच उद्देश नसून, निवृत्तीनंतरचे आर्थिक सुरक्षा कवच जपण्यालाही प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळेच, तुमच्या एकूण पीएफ शिल्लक रकमेपैकी किमान २५% हिस्सा कायमस्वरूपी 'लॉक' ठेवला जाईल, जेणेकरून भविष्यातील सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही. उर्वरित ७५% रक्कम तुम्ही गरजेनुसार सहजपणे काढू शकाल. लांबलचक क्लेम प्रक्रिया रद्द करून, आता पूर्णपणे स्वयंचलित डिजिटल प्रणालीवर भर दिला जाणार असून, यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे.

Comments
Add Comment