नवी दिल्ली : स्कॉटलंड संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या क गटात इटलीविरुद्धच्या लढतीत ७३ धावांनी विजय मिळवला. स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सीच्या (८४ धावा) उल्लेखनीय फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी कमाल केली आणि क गटाच्या गुणतालिकेत इंग्लंडला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले.
जॉर्ज मुन्सी व मिचेल जॉन्स यांनी पहिल्या विकेटसाठी १३.५ षटकांत १२६ धावा जोडल्या. मुन्सीने सलग दुसरे अर्धशतक झळकावले आणि तो शतक पूर्ण करेल असे वाटत होते. पण, १४ व्या षटकात ग्रांट स्टीवर्टने त्याची विकेट घेतली. मुन्सीने ५४ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ८४ धावा केल्या. या वर्ल्ड कपमधील ही संयुक्तिक सर्वोत्तम खेळी ठरली. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने अमेरिकेविरुद्ध ८४ धावा केल्या होत्या. दरम्यान इटलीचा कर्णधार वेय मॅडसेन याचा खांदा क्षेत्ररक्षण करताना निखळला आणि त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली.
जॉन्सही ३० चेंडूंत ३७ धावांवर माघारी परतल्यानंतर ब्रेंडन मॅकमुलेनने मोर्चा सांभाळला आणि १८ चेंडूंत ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावा कुटल्या. कर्णधार रिची बेरिंगटन ( १५) व टॉम ब्रूस ( १) फार काही करू शकले नाही. लिस्कने ५ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २२ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला २० षटकांत ४ बाद २०७ धावांपर्यंत पोहोचवले.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २००+ धावा करणारा स्कॉटलंड हा पहिला संलग्न संघ (associate team) ठरला. यापूर्वी अमेरिकेने कॅनडाविरुद्ध १९७ धावा केल्या होत्या. वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या इटलीला लक्ष्याचा पाठलाग करताना १३४ धावाच करता आल्या. कर्णधार वायन मॅडसेन दुखापतीमुळे मैदानावर उतरू शकला नाही आणि नववी विकेट पडताच स्कॉटलंडचा विजय पक्का झाला. स्कॉटलंडकडून बेन मॅनेंटीने ३१ चेंडूंत ५२ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ हॅरी मॅनेंटी ( ३७) व जेजे स्मुट्स ( २२) हे चांगले खेळले. अन्य फलंदाज अपयशी ठरले. स्कॉटलंडच्या मायकल लिस्कने १७ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर मार्क वॅटने दोन बळी टिपले.







