पाकिस्तानातील मशिदीतील स्फोटाची जबाबदारी घेणारा आयसिस म्हणजे इराक आणि सीरीयातील सुन्नी मुस्लिम गट आहे. त्यांचा उद्देश्य असतो की शियांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले करायचे आणि त्यांना ठार मारायचे. काही वर्षापूर्वी त्यानी लाखो लोकांवर राज्य केले आणि त्याद्वारे आपली दहशत पसरवली
इस्लामाबादमधील एका शिया पंथाच्या दर्ग्यानजीक एका आत्मघातकी मानवी बाँबने स्वतःला उडवले. या स्फोटात ३१ लोक ठार तर १६९ जण जखमी झाले. तरलाई इमामबर्ग येथे हा शक्तीशाली बाँबस्फोट झाला.आता पाकिस्तानने अफगाणिस्तानवर आणि भारतावर या स्फोटाचे खापर फोडले. पाकिस्तानचे म्हणणे आहे, की अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवला पण भारताने त्यांना आर्थिक मदत केली. पाकचा हा कुटील कांगावा आहे हे सहज लक्षात येते. कारण भारत कुणाच्याही देशात ढवळाढवळ करत नाही आणि पाकच्या उलट्या काळजाच्या देशात तो असे उद्योग करण्याची शक्यता जवळपास नाही. अद्याप कोणत्याही गटाने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली नाही. तरीही पाकने अफगाणिस्तान आणि भारतावर या स्फोटाचे खापर फोडले. मुळात पाकने आतापर्यंत दहशतवाद्यांना पोसण्याचे काम केले. तो दहशतवाद्यांचा सरपरस्त आहे. त्यामुळे पाकचे औषध त्यालाच पाजण्यात आले. कारण पाकने आतापर्यंत हेच केले. त्याने निरपराध भारतीय नागरिकांना ठार केले. तेही शेकड्यांनी. २००८ चा बाँम्बहल्ला आणि दहशतवाद्यांचा धूडगूस आणि भारतातील ट्रेनमध्ये घडवलेले स्फोट मालिका अशी कितीतरी उदाहरणे आहे. त्यामुळे पाकवर असा दशहतवादी हल्ला झाला तर त्याबद्दल फारसे वाईट वाटण्याचे काही कारण नाही.
पाकला सुसाईड बाँबहल्ले नवे नाही. तीन महिन्यांपूर्वी इस्लामाबाद येथे अशाच एका सुसाईड बाँबरने हल्ला केला होता. या हल्ल्याचा पाकचे अध्यक्ष आणि पंतप्रधान यांनी निषेध केला. पण त्यात काही अर्थ नाही. कारण आतापर्यंत पाकने जे पेरले तेच उगवले. त्यातही पाकचा खोटारडेपणा असा, की भारतावर आरोप करताना पाक हे विसरला, की भारत दुसऱ्या देशात असे उद्योग करत नसतो. हे पाकचे काम आहे. पाकिस्तानचा मित्र म्हणून चीनने या हल्ल्याचा निषेध केला. कोणताही हल्ला होणे आणि त्यात निरपराध नागरिकांचे बळी जाणे हे नेहमीच वाईट असते. पण पाकने भारतावर पूर्वी असेच हल्ले केलेत. पेहलगाम येथे निरपराध हिंदू कुटुंबियांना पाकच्या दहशतवाद्यांनी वेचून ठार केले. त्यामुळे पाकने आता कितीही व्याख्यान झोडले तरीही पाकचे कृत्य नापाक आहे हे जगापासून लपून राहिलेले नाही. पाकचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी म्हटले, की भारताने अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना पैशाची मदत केली आणि त्यामुळेच हा हल्ला झाला. पण त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाही. मागेही भारतातील हल्ले पाक पुरस्कृत होते. पाकने चीनच्या मदतीने मसूद अझर याला अनेक वर्षे दहशतवादी घोषित करण्यास अडथळे आणले. त्यात चीनने आपला व्हेटो अधिकार वापरून मसूदला दहशतवादी घोषित करू दिले नाही. भारताने कित्येक वेळा पाककडे अझरला आपल्या हवाली करण्याची मागणी केली होती. पण तसे झाले नाही. तोच पाकिस्तान आता भारतावर आरोप करत आहे. खरी वस्तुस्थिती अशी आहे, की आपल्या सामाजिक रचनेला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्याऐवजी पाकिस्तान भारत किंवा अन्य एखाद्या देशाविरोधात असे कट रचल्याचा आरोप करतात पण त्यात तथ्य नसते. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले. कारण पाकचा आरोप निराधार आहे. हे भारताच्य संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले असून पाकने स्वतःची सुरक्षा यंत्रणा तपासावी आणि त्यातील कमतरता दूर कराव्यात असा सल्ला दिला. पाकिस्तानी सरकार आणि मीडिया नेहमीच असे बेजबाबदार आणि हास्यास्पद आरोप कुठल्याही पुराव्याशिवाय करतात आणि हा प्रकार त्यातलाच आहे.
पाक हा नेहमीच भारत तर कधी अफगाणिस्तानवर आरोप करतो. पाकवर मृतांच्या कुटुंबियाना उत्तरे देण्याची जबाबदारी वाढत आहे आणि त्यापासून आपली सुटका करून घेण्यासाठी पाक असे डाव आखतो. इस्लामाबादमधील घटनेने केवळ देशातील प्राणघातक सुरक्षा त्रुटी उघड केल्या नाहीत तर प्रादेशिक तणावही वाढवला आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांशी लढण्यात आपण शून्य प्रगती केल्याचे दाखवून दिले. पण इस्लामाबादमधील हल्ल्याने त्यांची ही प्रगती किती नाजूक अवस्थेत आहे हे लक्षात आणून दिले. आता इस्लामिक स्टेटने या भीषण हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि २००८ मध्ये झालेल्या मॅरियट हॉटेलच्या बाँबस्फोटानंतर हा हल्ला इस्लामाबादेतील सर्वात भीषण हल्ला असल्याचे म्हटले आहे. पाकने चार संशयितांना अटक केली आहे. पाकिस्तानातील मशिदीतील स्फोटाची जबाबदारी घेणारा आयसिस म्हणजे इराक आणि सीरीयातील सुन्नी मुस्लिम गट आहे. त्यांचा उद्देश्य असतो की शियांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले करायचे आणि त्यांना ठार मारायचे. काही वर्षापूर्वी त्यानी लाखो लोकांवर राज्य केले आणि त्याद्वारे आपली दहशत पसरवली. हाय प्रोफाईल हल्ले करण्याची त्यांची क्षमता कायम आहे. त्यांची पाळेमुळे सीरियाच नव्हे तर अगदी ऑस्ट्रेलियापर्यंत पसरली आहेत आणि नुकताच त्यांनी त्या देशात भीषण हल्ला घडवून १५ लोकांना ठार केले होते. गेल्या काही वर्षात पाक अफगाणिस्तान सीमेवर वाढत्या दहशतवादाचा सामना करावा लागला असला तरीही राजधानी इस्लामाबादमध्ये असा हल्ला होणे ही क्वचितच घडणारी बाब आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या हल्ल्याचा निषेध केला असून त्यांनी म्हटले आहे, की युद्ध गुन्ह्यांत याचा समावेश होऊ शकतो. भारताने म्हटले आहे, की पाक स्वतःच्या देशांतील सामाजिक चौकटीतील समस्या सोडवण्याऐवजी इतरांवर म्हणजे भारतावर त्याचा दोष ढकलत आहे हे अत्यंत वाईट आणि अशोभनीय आहे. शिया आणि सुन्नी मुस्लिम यांच्यात पंथीय हिंसाचार आणि वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे या शिया दर्ग्यावर हल्ला करण्यात आला आणि आयसिसच्या तत्वानुसार हे योग्य आहे. याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे शिया जमात ही आयसिसविरोधात लढण्यासाठी मनुष्यबळ पुरवते आणि हा हल्ला म्हणजे प्रत्युत्तर म्हणून हल्ला होता. राजधानीत आपण दहशतवाद पेरू शकतो आणि आयसिसची क्षमता राजधानीतही हल्ले करण्याची आहे हे दाखवून देण्यासाठी हा हल्ला होता असेही मानण्यात येते.