Saturday, February 7, 2026

साप्ताहिक राशिभविष्य , ८ ते १४ फेब्रुवारी २०२६

साप्ताहिक राशिभविष्य , ८ ते १४ फेब्रुवारी  २०२६

साप्ताहिक राशिभविष्य, १ ते ७ फेब्रुवारी २०२६

मोलाचा सल्ला मिळेल

मेष :या आठवड्यात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना काही वेळेस आपली मनस्थिती विचित्र करू शकतात. काही नकारात्मक विचारांच्या व्यक्ती भेटल्यामुळे आपल्या कार्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे आपण एखाद्या ताणतणावाखाली राहू शकता. जाणूनबुजून, हेतुपुरस्सर लहान-मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. त्यामुळे आपले मन शांत राहील. कोणताही निर्णय घेताना शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. कुटुंबात आपल्या जीवनसाथीची आपल्याला मदत मिळेल. मोलाचा सल्ला मिळेल. नोकरीत तसेच व्यवसाय-धंद्यात कोणाशीही वाद-विवाद घालण्याचे टाळलेले बरे. जुन्या ओळखी नव्याने प्रस्थापित होतील. सहकुटुंब, सहपरिवार प्रवासाचे नियोजन करू शकाल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील.

भाग्याचे पाठबळ मिळेल

वृषभ : या आठवड्यात आपल्याला भाग्याचे पाठबळ मिळेल. काही अनुकूल घटना आपल्या अवतीभोवती घडत जातील. कुटुंबामधील वातावरण चांगले राहून जीवनसाथी चांगली साथ देईल. वैवाहिक सुख मिळेल. कुटुंबामध्ये मंगल कार्याचे नियोजन होऊ शकते. कोणतीही चर्चा करताना शांत राहण्याची आवश्यकता. व्यवसाय, धंदा, नोकरी तसेच कौटुंबिक परिस्थितीत कोणत्याही समस्या निर्माण झाल्या तरी आपण संयम आणि कौशल्याने परिस्थितीतून मार्ग काढाल. आरोग्य चांगले राहील. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. भावंडांशी सख्य राहील. तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील.

महत्त्वाची कामे होतील

मिथुन : नोकरीधंद्याच्या निमित्ताने अथवा कौटुंबिक कारणांसाठी आपल्याला लहान-मोठे प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. प्रवासात वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा, तसेच खाण्यापिण्यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम पाळा. आपली महत्त्वाची कागदपत्रे तसेच मौल्यवान वस्तू जपा. जोडीदाराची साथ चांगल्या प्रकारे मिळेल. खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता. लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगणे जरूरी आहे. नोकरीत, व्यवसाय, धंद्यात समाधानकारक परिस्थिती अनुभवता येईल. कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे वेळेतच लक्ष द्यायला पाहिजे. महत्त्वाची कामे होतील.

यश मिळेल

कर्क : काही आपल्या मनासारख्या अनुकूल घटना घटित झाल्यामुळे आपल्या आत्मविश्वासात वृद्धी होईल; परंतु अतिआत्मविश्वास टाळा. तसेच लहान-मोठे निर्णय पूर्ण विचाराअंती घ्या. इतरांच्या मतास प्राधान्य देणे हितकारक ठरेल. नोकरीमध्ये अनुकूलता. आपले मत इतरांना पटवून देण्यात यश मिळेल. वरिष्ठांचे तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. कुटुंबात मात्र समंजसपणे भूमिका पार पाडावी लागेल. स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता आहे. इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. बहीण-भावांबद्दल काळजी वाटू शकते.

आपले कौतुक होईल

सिंह : नोकरीत अनुकूलता लाभेल. आपण पूर्वी केलेल्या कामाबद्दल आपले कौतुक होईल. पदोन्नती, वेतन वृद्धीची शक्यता. अधिकारात वाढ झाल्यामुळे जबाबदाऱ्या सुद्धा वाढतील, याची जाण अत्यावश्यक ठरेल. सरकारी कामात आपल्या कार्यकक्षा ओलांडू नका. व्यवसाय-धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील. उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. सामाजिक क्षेत्रात एखादे भरीव कार्य आपल्या हातून होईल. सभा समारंभाची निमंत्रणे येऊ शकतात, तसेच त्यामध्ये आपल्याला एखादे मानाचे स्थान मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

ओळखी-मध्यस्थीतून कामे होतील

कन्या : आपण आत्तापर्यंत काही महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची वाट बघत बसला होता अशा स्वरूपाची कामे या आठवड्यात गतिमान होऊन पूर्ण होण्याची शक्यता आहे, मात्र आपल्या प्रयत्नात आपण कमी पडून देऊ नका. भाग्याची साथ मिळेल. अडचणी दूर होतील. नोकरीधंद्यात चांगली परिस्थिती राहील. नोकरीत पदोन्नती किंवा वेतन वृद्धी मिळू शकते. लहान-मोठ्या अंतराचे प्रवास करावे लागतील, मात्र प्रवास जपून करावा लागेल, गृहसौख्य चांगले राहील. जोडीदाराची साथ मिळेल. जमीन-जुमला अथवा स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात वाद-विवाद टाळा. ओळखी-मध्यस्थीतून कामे होतील.

आर्थिक परिस्थिती चांगली राहील

तूळ : व्यवसाय-धंद्यातील दीर्घकाळ रखडलेली येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहील, तसेच व्यवसायातील उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. व्यवसायात केलेले बदल सकारात्मक परिणाम घडवून आणतील. मात्र महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. शांतपणे निर्णय घ्या. संयम बाळगा. आजूबाजूच्या परिस्थितीचे अवलोकन करून निर्णय घ्या. कुटुंबात आपल्या जोडीदाराचे मत विचारात घ्या. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराचे मत अथवा विचार महत्त्वाचा ठरेल. प्रवास करावे लागतील; परंतु प्रवासात दगदग होण्याची शक्यता आहे.

अडचणी दूर होतील

वृश्चिक : जमीन-जुमला, स्थावर मालमत्ता इत्यादींच्या विषयी थंडावलेले व्यवहार पुन्हा गतिमान होतील व पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. त्यातून भरघोस आर्थिक फायदा मिळू शकतो. अडचणी दूर होतील. ओळखी, मध्यस्थी उपयोगी पडतील. सरकारी कामात होणारा विलंब टळेल. अचानक खर्चात झालेली वाढ आपल्याला आश्चर्यचकित करू शकते. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. मुला-मुलींकडून समाधान देणाऱ्या वार्ता मिळाल्यामुळे समाधानी राहाल. कर्तव्यपूर्ती होईल. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सक्रिय भाग घ्याल.

मंगलकार्य ठरू शकते

धनु : नोकरीत तसेच व्यवसाय-धंद्यात चांगली परिस्थिती राहील. येणाऱ्या समस्या आपण यशस्वीपणे हाताळाल, मात्र महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी धावपळ करावी लागेल. दगदग होईल. काही वेळेस मनस्ताप सुद्धा सहन करावा लागेल. इतरांशी वाद-विवाद होऊ शकतात ते टाळणे हिताचे ठरेल. कुटुंबात मात्र जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. घरात सदस्यांशी चांगला समन्वय व सुसंवाद घडेल. घरात एखाद्या धार्मिक कार्याचे नियोजन होऊ शकेल. विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या विवाहाबद्दलच्या वाटाघाटी यशस्वी होऊन मंगलकार्य ठरू शकते. धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.

क्रोध नियंत्रणात ठेवा

मकर : नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवृद्धी होईल. त्याबरोबर आपल्या अधिकारातही वाढ होईल, मात्र जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. कामाच्या स्वरूपात बदल घडून स्थानाच्या स्वरूपातही बदल घडू शकतो. सरकारी नोकरीत अतिरिक्त कार्यभार स्वीकारावा लागेल, तसेच बदलीची शक्यता आहे. आपण आपल्या अधिकाराच्या मर्यादा ओळखून आपले कार्य पूर्ण करणे हिताचे ठरेल, तसेच लहान-मोठी प्रलोभने टाळा. कामानिमित्त अथवा काही कौटुंबिक कारणांमुळे प्रवास करावा लागेल. कुटुंबातील मुलांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. काही वेळेस मतभेदांची शक्यता. आपले क्रोध नियंत्रणात ठेवा. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या राहतील. त्यासाठी जास्तीचा खर्च होऊ शकतो.

आनंदी राहाल

कुंभ : धनलाभाच्या दृष्टिकोनातून चांगला काळ आहे. अनेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. नेहमीच्या उत्पन्न स्त्रोतांच्या पेक्षा नवीन मार्गांनी पैसा हाती येईल, त्यामुळे आनंदी राहाल. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी मुक्त हस्ते खर्च कराल. धार्मिक कार्यात भाग घेऊन दानधर्म करण्याची इच्छा होईल. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. धावपळ करावी लागेल. वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते, मात्र काहीवेळा सुखद अनुभव येतील. चालू नोकरीपेक्षा जास्त चांगली नोकरी शोधण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. सरकारी नोकरीत मानसन्मानाचे योग आहेत. आपले म्हणणे इतरांना पटवून देण्यात आपण यशस्वी व्हाल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील.

मालमत्तेच्या कामात यश

मीन : कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास घडू शकतात. नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. आपण केलेल्या कामाचे बक्षीस मिळेल. पदोन्नती, वेतन वाढ होऊ शकते, मात्र बदलीची तयारी ठेवावी लागेल. कामाच्या स्वरूपातही बदल घडू शकतो. वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. तसेच बरोबरच्या सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कौटुंबिक आघाडीवर समाधानी राहाल. कुटुंबात मंगलकार्य घडेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकाल. आर्थिक बाजू बळकट होईल. मालमत्तेच्या कामात यश संपादित करू शकाल. जुन्या गुंतवणुका आर्थिक फायदा मिळवून देतील.
Comments
Add Comment